मुलगा मृतावस्थेत तर आई बेशुद्ध अवस्थेत बंगल्यात आढळले; मृतदेहाचा वास येऊ लागल्याने प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

संबंधित बंगल्यातून वास येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. त्यानुसार अग्निशमनदलाच्या मदतीने घराचे दार तोडून आत गेले असता सदावर्ते यांचा मृतदेह आढळून आला.

पुणे : बंगल्यातून वास येतोय म्हणून शेजारच्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह घरात आढळून आला. तर त्यांची आई बेशुद्ध अवस्थेत बाथरूममध्ये पडलेली सापडली. किमान तीन दिवसांपासून हे दोघेही घरातच पडून असल्याचा अंदाज आहे.

डोक्‍यात दगड घालून मित्राला कॅनॉलमध्ये ढकलले; स्वारगेटजवळ घडली घटना

सहकारनगर भाग दोनमधील शिरीष सोसायटीमधील एका बंगल्यात हा प्रकार घडला आहे. आशीर्वाद त्रिंबक सदावर्ते (वय 42 वर्षे) यांचा मृतदेह बंगल्यात आढळून आला आहे. तर त्यांची सुमारे 90 वर्षीय आई मोहना त्रिबक सदावर्ते बेशुद्ध अवस्थेत सापडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.21) सकाळी संबंधित बंगल्यातून वास येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. त्यानुसार अग्निशमनदलाच्या मदतीने घराचे दार तोडून आत गेले असता सदावर्ते यांचा मृतदेह आढळून आला. तर त्यांची आई या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदावर्ते यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

सायबर चोरट्याचा पराक्रम; परस्पर कर्ज मंजूर करून घेत तरुणाला साडेचार लाखांना गंडवले!

या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी सदावर्ते यांच्या बहिणींना दिली होती. त्यांनी पुण्यात राहत असलेल्या बहिणीला याबाबत कळवले. त्यानुसार त्या आणि त्यांचे पती घरी गेल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. सदावर्ते यांचे लग्न झालेले नव्हते. यांना दारूचे व्यसन होते, तर त्यांच्या आईला पोटाचा विकार आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली आहे.

सदावर्ते यांचे लग्न न झाल्याने माय-लेक दोघेच घरी राहत. शेजारऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. सदावर्ते यांच्या मृतदेहाचे विघटन होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तर त्यांच्या आईवर उपचार सुरू असल्याने त्यांनी अद्याप याबाबत काही माहिती दिलेली नाही.
- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दत्तवाडी पोलिस ठाणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a man was found dead in a bungalow in Sahakarnagar