डोक्‍यात दगड घालून मित्राला कॅनॉलमध्ये ढकलले; स्वारगेटजवळ घडली घटना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची सहा दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी मित्रावर वार केले. त्यानंतर त्याच्या डोक्‍यात दगड घालून त्याला कालव्यात ढकलून दिल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेटमधील कैलास भुवन शेजारील कॅनॉल रस्त्यावर मंगळवारी (ता.22) रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला. यातील तीनही आरोपींना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

बेरोजगारांना मिळणार पगाराच्या ५० टक्के भत्ता​

प्रेम ऊर्फ टकल्या प्रताप परदेशी (वय 25, रा. ओटा नं.17, शिवदर्शन), ओंकार ऊर्फ पप्पू शंकर जोशी (वय 22, रा. गोलघर, शिवदर्शन) आणि अक्षय ऊर्फ गोट्या रामदास लोळे (वय 22, रा. पर्वतीदर्शन) असे अटक केलेल्या तिघांचे नावे आहेत. त्यांच्याविरोधात शुभम रोकडे (वय 24, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

शंभर कोटींवर पाणी! स्पर्धा परीक्षांचे अर्थकारणच ठप्प​

फिर्यादी शुभम, प्रेम आणि ओंकार हे तिघे मित्र आहेत. शुभम यांचे ओंकारसोबत भांडण झाले होते. त्यानंतर प्रेम याने शुभम यांना ओंकारच्या घरी बोलावून घेतले. तेथून त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून स्वारगेट येथील घटनास्थळी नेले. तेथे आरोपींनी शुभम याच्या डोक्‍यात दगड घालून तसेच हत्याराने वार करून जखमी केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभम याला आरोपींनी कालव्यातील पाण्यात ढकलून दिले. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवत फिर्यादी घरी गेला. तेथून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची सहा दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. शेख पुढील तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trio threw a stone at friends head and pushed him into canal