तरुणांनी श्रमदानातून काढला विहिरीतील गाळ

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 25 मे 2018

मंचर (पुणे) : फलोदे (ता. आंबेगाव) या आदिवासी गावातील तरुणांनी पाणीटंचाई कमी करण्यासाठी सार्वजनिक विहिरीतील पाच फूट गाळ श्रमदानातून काढला. त्याचा फायदा गावठाणात राहणाऱ्या 70 कुटुंबांना होणार आहे.

मंचर (पुणे) : फलोदे (ता. आंबेगाव) या आदिवासी गावातील तरुणांनी पाणीटंचाई कमी करण्यासाठी सार्वजनिक विहिरीतील पाच फूट गाळ श्रमदानातून काढला. त्याचा फायदा गावठाणात राहणाऱ्या 70 कुटुंबांना होणार आहे.

या गावात मागील काही दिवसांपासून विविध विधायक उपक्रम ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत, सरकारी योजना व खासगी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांतून गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नुकतेच गावातील युवकांनी एकत्रित येत गावातील सार्वजनिक विहिरीतील गाळ श्रमदानाच्या माध्यमातून काढला. या विहिरीची खोली सुमारे 35 फूट असून, बारा फूट व्यास आहे. वर्षानुवर्षे विहिरीत गाळ साठल्यामुळे विहिरीची पाणी साठवणक्षमता कमी झालेली होती. या पार्श्वभूमीवर हे श्रमदानाचे काम भविष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असे ठरणार आहे. फलोदे गावात सद्यःस्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील जलस्रोत अधिक बळकट करण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करीत आहेत. विहिरीतील गाळ काढल्याने भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. या श्रमदानाच्या कार्यात ग्रामपंचायत सदस्य मनोहर मेमाणे, ज्ञानेश्वर मेमाणे, संतोष ऊतळे, रोहिदास मुठे, बाळू मेमाणे, मोहन शिंगाडे, भागू मेमाणे, संतोष कोकाटे, अमोल वाघमारे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या या विधायक उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले.

Web Title: manchr youth took out mud of the well