esakal | मंडईतील पार्किंगमध्ये तिपटीपेक्षा जास्त वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

Paid-Parking

मंडईतील पार्किंगमध्ये तिपटीपेक्षा जास्त वसुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्थळ - हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ, महात्मा फुले मंडई. महापालिकेने दुचाकीसाठी निश्‍चीत केलेला प्रतितास दर- तीन रुपये, नागरिकांकडून वसूल केले जातात प्रतितास- १० रुपये. पावतीवर तीन रुपये लिहिले आहे, मग १० रुपये का घेता, असे विचारले तर तेथील कामगारांच्या दादागिरीला सामोरे जावे लागते. ना कुठे माहिती फलक, ना कुठे तक्रार करण्यासाठी नंबर. वाहनचालकांनी मुकाट्याने हातात पैसे टेकवायचे आणि तेथून चालते व्हायचे, असाच प्रकार येथे सुरू आहे.

मंडई परिसरात चुकीच्या ठिकाणी गाडी लावल्यास वाहतूक पोलिस गाडी उचलून नेतात. त्यामुळे महापालिकेच्या वाहनतळांमध्ये गाडी लावणे सुरक्षित ठरते. हीच समस्या चारचाकी वाहनचालकांचीही आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना मिळेना पसंतीचे महाविद्यालय

शहराच्या मध्यवर्ती भागात महात्मा फुले मंडई येथे बाबू गेनू वाहनतळ आहे. महापालिकेने ठेकेदारासोबत केलेल्या करारानुसार दुचाकीसाठी प्रतितास तीन रुपये आणि चारचाकीसाठी प्रतितास चौदा रुपये शुल्क आहे. यानुसार पावती देऊन नागरिकांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. मात्र, येथे ठेकेदाराने कराराची पायमल्ली करून दुचाकीसाठी १० रुपये, तर चारचाकीसाठी २० रुपये वसूल केले जात आहेत.

पावती तीन रुपयांची, वसुली १० रुपयांची

वाहनतळात लूट सुरू असल्याची तक्रार आल्याने ‘सकाळ’ने या ठिकाणी पाहणी केली. बाहेर पडताना दुचाकीस्वारांकडून १० रुपये घेत असल्याचे व्हिडिओदेखील उपलब्ध आहेत. पहिल्या मजल्यावर दुचाकी लावल्यानंतर तेथे बसलेला कामगार ‘पावती घेऊन जा’, अशा सूचना करतो. पावती देताना त्यावर गाडी नंबर व वेळ लिहून देतो आणि प्रतितास १० रुपये भाडे आहे, असे सांगतो. प्रत्यक्षात पावतीवर तीन रुपयांचाच उल्लेख आहे.

हेही वाचा: Polytechnic : ऑपशन फॉर्म भरण्यासाठी तब्बल 44 हजार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

याच पद्धतीने चारचाकीचे शुल्क वसूल केले जाते. नागरिक काम करून बाहेर पडताना, गेटवर वेळ बघून तासानुसार पैसे घेतले जातात. नागरिकांनी पावतीनुसार पैसे घेण्याची विनंती केल्यास त्यांना, ‘तुला गाडी लावतानाच रेट सांगितला होता ना’ अशी दादागिरी करून पैसे वसूल केले जातात. याठिकाणी असे चार-पाच कामगार असल्याने नागरिक त्यांना विरोध न करता निमूटपणे पैसे देऊन सुटका करून घेतात.

महापालिकेने वाहनतळासाठी जो दर ठरवून दिला आहे, तेवढेच पैसे घेणे बंधनकारक आहे. बाबू गेनू वाहनतळ येथे जास्त पैसे घेतल्याची तक्रार आलेली नाही. नागरिकांची तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, वाहतूक नियोजन

loading image
go to top