मुख्याध्यापकांनो, आता शाळांत वाजवा तीन 'वॉटर बेल'!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पाणी कमी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहाड्रेशन), थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, मुतखडा (किडनी स्टोन) होणे, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्‍यता असते.

पुणे : राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सूचना देण्यासाठी प्रत्येक शाळेत तीन 'वॉटर बेल' वाजविणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या बेलची वेळ मुख्याध्यापकांना निश्‍चित करता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शालेय शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे, की राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता, हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. शरीरात आवश्‍यक तेवढे पाणी न प्यायल्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो.

- पुणे : वरिष्ठ लिपिकासह तिघावर लाच घेताना कारवाई 

मुलांनी सर्वसाधारणपणे दीड ते दोन लिटर पाणी प्यायला हवे; जे प्रमाण वय, उंची आणि वजनानुसार बदलते. बऱ्याच पालकांची तक्रार असते की, घरून भरून नेलेली पाण्याची बाटली मुले तशीच घरी परत आणतात. पाणी कमी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहाड्रेशन), थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, मुतखडा (किडनी स्टोन) होणे, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्‍यता असते.

शाळेतील मुले अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात, तेव्हा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजविण्याच्या उपक्रमांतर्गत शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा घंटा वाजविण्याबाबत मुख्याध्यापकांनी वेळ निश्‍चित करावी. त्यामुळे या राखीव वेळेत मुलांना आवश्‍यकतेनुसार पाणी पिता येईल.

- महापालिकेचा अजब कारभार; बनवेगिरी करणाऱ्यांचे ‘चांगभले’

परिणामी, त्यांची पाणी पिण्याविषयीची मानसिकता तयार होईल व पुढे ती सवय होईल; तसेच या वेळेत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा देण्यात यावी. त्याकरिता 'वॉटर बेल' हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात यावा. याबाबतचा अहवाल आयुक्तांनी (शिक्षण) सर्व शाळांकडून घ्यावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandatory to ring three water bells in schools to instruct students for drinking water