समाजाचा विरोध असताना दुर्गम भागातील तरुणी झाली पहिली पदवीधर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mangal Tupe
समाजाचा विरोध असताना दुर्गम भागातील तरुणी झाली पहिली पदवीधर

समाजाचा विरोध असताना दुर्गम भागातील तरुणी झाली पहिली पदवीधर

sakal_logo
By
मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) - सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये पदवीधर हे शिक्षण जरी आपणास मोठे वाटत नसले तरी वेल्हे तालुक्यातील काही दिवसापर्यंत नॉट रिचेबल असणाऱ्या अठरा गाव मावळ परिसरातील सामाजिक स्तर, शिक्षणाची परिस्थिती, त्यातूनच मुलींचे शिक्षणाबाबतची पालकांची उदासीनता, मुलींच्या शिक्षणाला होणारा समाजाचा विरोध ही दिव्य पार पाडत एका तरुणीने पदवीधर होणे यावर न थांबता पुढे जाऊन सामाजिक कामातील पदवी (MSW) होऊन नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहून घर सांभाळणे हे उच्च शिक्षणापेक्षा कित्येक पटीने मोठे आहे. ही कहाणी आहे पुणे जिल्ह्यातील अति दुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या वेल्हे तालुक्यातील दुर्गम अशा पासली गावातील २३ वर्षीय तरुणी मंगल वामन तुपे हिची .

तालुक्यात काही गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ते उपलब्ध नाहीत. तसेच गावाकडे मुलींसाठी फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र वेल्हे तालुक्यातील पासली गावातील एका अतिसामान्य कुटुंबातील मुलगी ही पासली गावातील पहिली पदवीधर झाली आहे. समाजाचा विरोध असताना आई वडिलांच्या पाठींब्यामुळे तिला हे शिक्षण पूर्ण करता आले.

भारतीय समाजात मुलीला काही भागात अद्यापही चूल आणि मूल यात गणले जाते. मात्र या मुलीने संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्श ठेवला आहे. घराची परिस्थिती खूप बेताची, आई वडील दोघेही अडाणी, घरात कुणीही शिकलेले नाही. मात्र, मुलीला शिकण्याची इच्छा होती. मात्र, समाजातील काही व्यक्ती आई वडिलांना नाव ठेवायला लागल्या. मात्र मुलीच्या वडिलांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या मुलीला पाठींबा देत तीला शिक्षणासाठी तिच्या पाठीशी उभे राहिले.

हेही वाचा: Pune : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करावा

शिक्षणासाठी मंगल २०१३ साली दहावीनंतर घराबाहेर पडली. शाळेत जाण्यासाठी सायकल नाही की गाडी नाही बऱ्याचदा पायी १० ते १२ किलोमीटरचा प्रवास करावा लागत. मात्र, याचा विचार न करता मंगलने आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. उच्च माध्यमिक शिक्षण वेल्हे येथील तोरणा विद्यालयात घेतले तर पदवीचे शिक्षण अमृतेश्वर महाविद्यालय विंझर येथे पूर्ण केले व सामाजिक कामातील पदवीचे शिक्षण पुणे येथील कर्वे समाज शिक्षण संस्थेमध्ये २०२०-२०२१ साली पूर्ण केले यासाठी वेल्हे तालुक्यातील ज्ञान प्रबोधनी संस्था व संस्थेच्या सुवर्णा गोखले यांचे सहकार्याने तिने आपले शिक्षण पूर्ण केले.

आज त्याच ज्ञान प्रबोधनी संस्थेमध्ये मंगल दोन महिन्यांपासून काम करत असून गावागावात जाऊन सर्वेक्षणाचे काम करते.व या कामासाठी संस्था तिला पगार सुद्धा देते यामुळे कुटुंबाची ती कमावती व्यक्ती झाली आहे. आज ती ३५ उंबरे असलेल्या गावातील पहिली पदवीधर मुलगी झाली आहे. त्यामुळे समाजापुढे तिने एक आदर्श निर्माण केला आहे.

वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मुली आता शिक्षणासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. आणि त्यांनी पुढे याव्यात जेणे करून समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेलं. त्यामुळे मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या घराचे आणि देशाचे नाव पुढे न्यावे. जेणे करून आपल्याला या जगात सन्मानाने जगण्याचा हक्क मिळेल असे मत मंगल तुपे व्यक्त करत आहे.

यावेळी मंगलच्या आई वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंगल पदवीधर झाल्याने अनेक खाजगी संस्थांनी तिचा सत्कार केला आहे, मात्र, स्थानिक लोक प्रतिनिधींनी याची साधी दखल देखील घेतली नाही.असेच म्हणावे लागेल.

loading image
go to top