Election Results : 'स्मार्ट' बापटांची खासदारकीपर्यंत सुलभ 'वाहतूक' 

- मंगेश कोळपकर 
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌ त्यात यशही ! नेमके मताधिक्‍य किती हे लवकरच समजेल पण बापटांचा हिशेब पूर्ण झाला. 

पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌ त्यात यशही ! नेमके मताधिक्‍य किती हे लवकरच समजेल पण बापटांचा हिशेब पूर्ण झाला. 

कोकणस्थ ब्राह्मण असले तरी, आपल्याभोवती विशिष्ट गोतावळा राहणार नाही, याची कायमच काळजी त्यांनी घेतली अन्‌ त्यामुळेच विविध जाती-समूहातील कार्यकर्त्यांना नगरसेवक अन्‌ पक्ष संघटनेतही विविध पदे मिळाली. प्रत्येक वेळी भाकरी बदलत राहिल्यामुळे काही जण त्यांच्यावर नाराज झाले. पण, त्यांचा उपद्रव होणार नाही याची काळजी बापटांमधील 'हेडमास्तर'ने घेतली. चौकाचौकात कार्यकर्त्यांच्या घोळक्‍यात रमणाऱ्या बापटांचा वावर शहरातील अनेक कट्ट्यांवर असायचा. रात्री उशीरापर्यंत गप्पांचे फड रंगवित असल्यामुळे बित्तबातमी त्यांच्यापर्यंत पोचत. अगदी पक्षातील विरोधकापासून पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी या सारख्या अनेक अधिकाऱ्यांचे काय सुरू आहे, याचीही त्यांना खडानखडा माहिती असते. काही वेळा उत्साहाच्या भरात केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरल्यावर विचलित न होता बापट ठाम राहिले. पाच वेळा निवडून आल्यावर विधानसभा अध्यक्षपद देण्याचे घाटत असताना, त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पालकमंत्रीपद मिळाले अन अन्न-औषध प्रशासनासारखे महत्त्वाचे पदही. पालकमंत्री पदाचा पुरेपूर वापर करीत बापट यांनी लोकसभेची तयारी केली. 

शहरात महत्त्वाचा ठरणारा प्रश्‍न सोडवितानाही त्यांना ठसा उमटविला अन्‌ तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यावर त्यांचे स्वागत करण्याचा बहुमानही ! सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी थेट व्यक्तिगत संपर्क असल्यामुळे महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडताना त्यांच्या पक्षाला त्रास झाला नाही अन म्हणूनच 100 नगरसेवक निवडून आले. सुरेश कलमाडी असो अथवा अजित पवार... त्यांच्याशी राजकीय संवादही साधण्याचे कसब त्यांच्याकडे असल्यामुळे शरद पवार यांनीही कायमच आदराचे स्थान दिले. टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली बापट यांची राजकीय कारकिर्दही बहरली. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी खासदारकी केवळ जिद्दीच्या बळावर मिळविली अन्‌ पक्षाचे पुण्यातील नेतृत्त्वही सिद्ध केले. भाजपमधील गटातटात योग्य "रस्ता' पकडल्यामुळे पालकमंत्रीपदावरून बापटांची खासदारपदापर्यंतची "वाहतूक' सुलभ झाली. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही...कारण बापटांचे टायमिंग परफेक्‍ट असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangesh Kolapkar writes about Girish Bapat win in Pune Loksabha constituency