मुळशीतील आंबा उत्पादक म्हणतोय, आता वर्ष कसं काढायचं? 

mulshi
mulshi

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील आंबा पीक शेतकरी अत्यल्प उत्पादन, चक्रीवादळाचा फटका, कमी बाजारभाव व पाडाला येण्यास झालेला उशीर या कारणांमुळे अ़डचणीत आला आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 80 टक्के फटका बसला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराचा खर्च आता कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.     

मुळशी तालुक्यात गेल्यावर्षी लांबलेल्या पावसाळ्यामुळे उशिरा आलेला मोहोर गळाला, त्यानंतर  मोहोर आला तोही उशिरा, पण त्याची फूलजळ आणि फळजळ खूपच झाली. त्यामुळे या वर्षी आंब्याचे उत्पादन ऐंशी टक्क्याने घटले. उत्पादन कमी आणि त्यात आणखी भर म्हणून भाव पडले. या वर्षी हापूसच्या उत्पादनाने आणि बाजारभावाने जसा दगा दिला, तसाच रायवळनेही दिला. त्यातून शेतकरी भूईसपाट झाला आहे. 

मुळशी तालुक्यात या वर्षी अत्यल्प प्रमाणात म्हणजे केवळ पाच ते सात टक्केच रायवळ आंब्याची फळे पाहायला मिळतात. त्यामुळे रायवळ आंब्याचे उत्पादन या वर्षी तब्बल किमान नव्वद टक्के घटले आहे. हे सगळे कमी म्हणून की काय, त्यात चक्री वादळाने आणखी दणका दिला. काही शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या बागा भूईसपाट करून टाकल्या. ज्या झाडाला काही प्रमाणात आंबे होते, त्या झाडाच्या फळांचा खच पडला. त्यामुळे मुळशीतील आंबा उत्पादक शेतकरी अक्षरशः कंगाल झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराचा खर्च आता कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.  

मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , गेल्यावर्षी हापूसला साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति डझन असा भाव होता. या वर्षी केवळ दोनशे ते तीनशे रुपये, असा बाजार मिळाला आहे. रायवळचे तर बिल्कूल उत्पादन झालेले नाही. त्यामुळे आडसाली फलधारणा, आलेले अत्यल्प उत्पादन, पडलेला बाजारभाव आणि भर म्हणून चक्री वादळाचा फटका, या कारणांमुळे आंबा पिकाने या वर्षी धोका दिला आहे.  

मुठा व खेचरे खोऱ्यात शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आंबा पीक आहे. या वर्षी बदललेले हवामान आणि चक्रीवादळाचा तडाखा यांमुळे आंबा पीकाला मोठा फटका बसला आहे. मुळशीत साधारणपणे आंब्याचे पीक उशिराच पाडाला येते. वटपौर्णिमेपर्यंत हा आंबा पिकवून शेतकरी बाजारात विक्रीला नेतो. परंतु, या वर्षी आंब्याला अजूनही पाड न लागल्याने हा फळ झाडावरच ठेवावे लागले. त्यानंतर झालेल्या चक्रीवादळाने सगळेच पीक उद्ध्वस्त झाले.

मुळशी तालुक्यात गेल्या हंगामात नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. त्यामुळे आंबा पिकाची मोहोर धारणा खूप उशिरा झाली. त्यानंतरही वारंवार ढगाळ वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणावर आलेला मोहोर गळून पडला. त्यामुळे हापूस, पायरी या वाणाच्या आंब्यांना फळधारणा झालीच नाही. सध्या केवळ केशर जातीच्या आंब्यांना अल्प प्रमाणात फळे  लागलेली असून, जून महिना निम्मा संपत आला, तरी या केशर आंब्याच्या फळांना पाड लागलेला नाही. त्यामुळे ही फळे झाडावरच होती. त्यामुळे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने ही फळे गळून पडली. बरीच झाडे मुळासकट तर काही झाडांच्या फांद्या मोडून जमीनदोस्त झाल्या.
 
केंद्र सरकारची फळबाग विमा योजना अस्तित्वात आहे, परंतु या योजनेचा लाभ मुळशीतील शेतकऱ्यांना कधीच होत नाही. कारण, या योजनेच्या अटी, शर्ती, तांत्रिक बाबी मुळशीतील भागासाठी योग्य नाहीत. ही योजना आंबापिकासाठी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीसाठीच आहे. मुळशीतील आंबा हा सुमारे जूनअखेरपर्यंत झाडावरच असतो. या पिकाला जास्त धोका हा जूनमध्येच असतो. त्यामुळे विम्याचे हप्ते भरूनही केवळ अटींमध्ये बसत नसल्याने कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मुळशीतील आंबा पीक एकतर लवकर पाडाला येत नाही. ज्यावेळी पाडाला येतो, त्यावेळी पावसाळ्यामुळे ग्राहक आंबा खायचा बंद करतो. त्यामुळे या वर्षी अत्यल्प उत्पादन, चक्रीवादळाचा फटका, बाजारपेठ व बाजारभावामुळे शेतकरी अ़डचणीत आला आहे.  
                          
कोळाव़डे येथील शेतकरी सयाजी आढाव यांनी सांगितले की, सरकारने फळबाग योजनेअंतर्गत असलेल्या आंबा पिकाच्या नुकसान भरपाईच्या अटी बदलाव्यात. चक्री वादळाने झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यावी. तालुका कृषी अधिकारी कुडल हसरमणी यांनी सांगितले की, या वर्षी आंबा पिकाला कमी प्रमाणात मोहोर आलेला आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या चक्री वादळामुळे आलेल्या आंबा फळाचे सुमारे वीस टक्के नुकसान झालेले 
आहे. 

निसर्गनियमानुसार केशर व अन्य काही जाती वगळता बहुतांशी आंब्यांच्या झाडांना आडसाल फलधारणा होत असते. एकवर्षी पालवी तर त्याच्या पुढ्च्यावर्षी मोहोर, असे फलधारणेचे चक्र चालू असते. या वर्षी आंब्याच्या 
झाडांना पहिला मोहोर आला, परंतु तो ढगाळ हवामानामुळे गळाला. त्यानंतर आलेल्या मोहोराची फूल व फळ गळतीही जास्त होती. त्यामुळे यंदा आंबा पिकाचे 
उत्पादन घटले आहे. 
 - डाॅ. सुनील जोगदंड,
सहकाय प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, पुणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com