esakal | मांजरी बुद्रुकचे ग्रामदैवत मांजराई देवी | Manjari
sakal

बोलून बातमी शोधा

मांजराई देवी

Manjari : मांजरी बुद्रुकचे ग्रामदैवत मांजराई देवी

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

मांजरी : अज्ञातवासात असताना पांडव आपली आई माद्रीसह रानावनातून प्रवास करीत पुढे जात होते. सुर्यास्ताला असेल तेथे मुक्कामी थांबायचे व सुर्योदयाला पुन्हा प्रवासाला लागायचे, असा त्यांचा नित्यक्रम असे. याच प्रवासात एका रात्री मुळा-मुठेच्या उजव्या कुशीत ते मुक्कामी राहिले. या मुक्कामात आपल्या आईची आठवण म्हणून पांडवांनी एक मंदिर बांधले. सुर्योदय झाल्याने कळसाचे काम अपूर्ण ठेवून ते पुढच्या प्रवासाला निघून गेले, अशी एक अख्यायिका सांगितली जाते. हे माद्रीचे मंदिर पुढे अपभ्रंश होऊन मांजरीचे झाले. याच मंदिराच्या भोवती वसलेले एक खेडे म्हणजे मांजरी बुद्रुक गाव व या गावचे ग्रामदैवत म्हणून श्रध्देने पूजली जाणारी हीच ती मांजराई देवी. 

संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये या मंदिराचे काम झालेले आहे. हेमाडपंथी शैलीतील मंदिराचे बांधकाम आहे. भक्तांना शक्ती देणारी किंवा संकल्प तडीस नेणारी महाशक्ती म्हणून मांजराई देविकडे पाहिले जाते. ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या या देविच्या दर्शनाने भक्ताची आत्मशक्ती वाढून जीवनात स्थैर्य आणि धैर्य येते, अशी भावना ग्रामस्थांसह आसपासच्या गावातील नागरिकांचीही आहे. मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भावपूर्ण वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो. 

हेही वाचा: '... तर जनता बुडाखालील खुर्च्या काढून घेईल'

जागृत ग्रामदैवत म्हणून ग्रामस्थांकडून देविची नियमीत पूजा अर्चा होत असते. पांडवांनी स्थापना केल्यामुळे त्या काळापासूनचा इतिहास या गावाला असल्याचे सांगितले जाते.

नवरात्रोत्सवात सकाळ-संध्याकाळी महाआरती, जागरण, गोंधळ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते. नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे देविची पूजा बांधली जाते. या काळात परिसरात मंडप व कमानी उभारण्यात येऊन त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येते. दररोज वेगवेगळ्या फुलांची सजावटही केली जाते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह व चैतन्याचे वातावरण असते. दसऱ्याच्या दिवशी सिमोलंघनाचा सोहळाही येथे थाटात साजरा केला जातो.

काम-धंद्या निमित्त बाहेरगावी असलेले या गावातील लोक नवरात्रात अवर्जून देविच्या दर्शनासाठी गावात येत असतात. सात वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिर परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून बागबगिचाही फुलविण्यात आला आहे.

हेही वाचा: लोगो - जागर स्त्री आरोग्याचा - डॉ. शीतल धनवडे

दरवर्षी चंपाषष्टीला ग्रामस्थांकडून देविचा उत्सव भरविला जातो. घराघरातून देविसाठी गोडधोडाचा नैवद्य पाठविला जातो. पै-पाहुण्यांनाही जेवनासाठी निमंत्रीत केले जाते. संकल्प पूर्ती करणारी देवी म्हणून तालुक्यातील विविध गावातूनही मोठ्या प्रमाणातील नागरीक येथे दर्शनासाठी येत असतात. ग्रामपंचायत, उत्सव समिती व ग्रामस्थांकडून या काळात होम हवन, पूजा आरती आदी विधी मोठ्या आनंदात पार पाडले जातात. वर्षभर देविच्या पुजेसाठी पूजाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे.

गावात येणाऱ्या नववधू किंवा माहेरवाशीन अवर्जून देविच्या दर्शनाचा अग्रह करीत असतात. अनेक पिढ्या आल्या-गेल्या मात्र देविच्या आगत-स्वागताची परंपरा आजही ग्रामस्थांनी टिकहून ठेवली आहे. आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ या ग्रामदैवता विषयी येथील ग्रामस्थांना आहे. देविला पौराणीक, ऐतिहासिक पार्श्र्वभूमी लाभलेली असल्याने ग्रामस्थांमध्ये श्रद्धेची भावना अधिकच दृढ झालेली दिसते. हे भक्ती आणि जिव्हाळ्याचे नाते परिसरातील प्रत्येक माणसाने जपलेले दिसत आहे.

loading image
go to top