
Sewerage Water : मांजरी उपबाजारामध्ये गुडघाभर पाण्यातून करावी लागते ये-जा
उंड्री - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेवाळेवाडी येथील मांजरी उपबाजारामध्ये मलवाहिनीचे चेंबर गेली दोन दिवसांपासून ओसंडून वाहत आहे. बाजाराच्या वाहनतळामध्ये पाणी शिरले असून, शेतकरी-व्यापाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे लेखी-भ्रमणध्वनीवरून तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी केली, दुरुस्ती नाही. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आम्ही आजार घेऊन जायचे का असा सवाल शेतकरी-व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
मांजरी उपबाजारप्रमुख विजय घुले म्हणाले, ‘गेल्या तीन आठवड्यापासून चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. मध्यंतरी थोडीशी दुरुस्ती केल्यानंतर पाणी थांबले. मात्र, घुलेवस्ती येथे कालव्यातील मलवाहिनी फुटल्याने तेथे चेंबर बांधले. मात्र, पाण्याच्या प्रवाहामध्ये चेंबर वाहून गेल्याने बाजार समितीमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. पाठपुरावा केला, तरी पालिका अधिकाऱ्यांकडून दुरुस्तीसाठी प्रतिसाद मळत नाही.’
शेतकऱ्यांचे नुकसान
दुर्गंधीयुक्त पाण्यातून करावी लागते ये-जा
शेतमाल खरेदीसाठी व्यापाऱ्यांची संख्या घटली
बाजारभाव पडले
सणाच्या काळात बसला आर्थिक फटका
शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी निवडला दुसरा पर्याय
तातडीने दुरुस्ती करावी
येथून शेतमाल घेऊन जाता येत नाही. दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने परिसर निसरडा झाला असून, त्यावरून ये-जा करताना पाय घसरून पडल्याने शेतकरी-व्यापाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेतले. पालिका प्रशासनाने तातडीने सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती अडचण दूर करण्याची मागणी केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास होत आहे. अशातच गुडघाभर पाण्यातून शेतमाल घेऊन जावा लागत आहे. ये-जा करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बाजार समिती आणि पालिका प्रशासनाच्या तातडीने उपाययोजना करावी.
- शिवाजी सूर्यवंशी
कालव्यातील चेंबरमधील गळतीमुळे मांजरी उपबाजारामध्ये चेंबर ओसंडून वाहत आहे. पाटबंधारे खात्याकडे संपर्क साधला असून, दोन दिवस कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. असे त्यांनी सांगितले.
- प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय