निधी नको झाडे द्या

कृष्णकांत कोबल
रविवार, 6 मे 2018

मांजरी (पुणे) - वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत गावाचा पर्यावरण समतोलही राखण्याच्या दृष्टिकोनातून मांजरी बुद्रक ग्रामपंचायतने घरांच्या नोंदींच्या बदल्यात "निधी नको झाडे द्या'', अशी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. येत्या काळात स्वच्छतेबरोबरच हरित मांजरी ग्रामलाही यामुळे चालना मिळणार आहे.

पालिका हद्दीलगतचे सर्वात मोठे गाव म्हणून मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. दररोज नवीन बांधकामे व नागरिकरणात भर पडत चालली आहे. त्यातुलनेत पर्यावरण संवर्धन होताना दिसत नाही. नव्याने बांधलेल्या किंवा घर खरेदी विक्रीची नोंद होताना सामान्य मिळकतदाराकडून ग्रामविकास निधी घेण्याऐवजी तीन-चार वर्षे वयाची पाच झाडे मिळकतदाराकडून घेण्यात येणार आहेत. या संकल्पनेमुळे सामान्य मिळकतदाराच्या पैशात बचत होऊन त्याला पर्यावरण संतुलन राखण्याच्या कामातील योगदानाचे समाधानही मिळणार आहे. या संकल्पनेबाबत ग्रामसचिवालयाबाहेर माहिती फलक लावण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी दिली.

काही वर्षांपूर्वी संपूर्ण बागायतदार गाव म्हणून ओळख असलेले मांजरी गाव नागरिकररण आणि विकासाच्या रेट्यात आपली ओळख हरवत चालले आहे. त्याचे पर्यावरण जपण्याचा प्रयत्न आजच झाला पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. या संकल्पनेमुळे गावातील झाडांची संख्या वाढून पर्यावरण संतुलन राखले जाईल. स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम म्हणून गावाला नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे. असे मत मांजरीचे सरपंच शिवराज घुले यांनी व्यक्त केले.

उपसरपंच अमित घुले, पुरुषोत्तम धारवाडकर, संजय धारवाडकर, सुनीता घुले, निर्मला म्हस्के, सुमित घुले, सुवर्णा कामठे, सीमा घुले, समीर घुले, उज्वला टिळेकर, नयना बहिरट, प्रमोद कोद्रे, जयश्री खलसे, नेहा बत्ताले, बालाजी अंकुशराव, आशा आदमाने, निलेश घुले व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: manjari news do not give fund give plants