मांजरी परिसरात पदपथांसह महामार्गावरही अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

मांजरी: पुणे-सोलापूर महामार्गावर रविदर्शन ते लक्ष्मी कॉलनी परिसरात पदपथांसह थेट महामार्गावरच विविध व्यावसायिकांकडून अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन प्रवाशांना कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

मांजरी: पुणे-सोलापूर महामार्गावर रविदर्शन ते लक्ष्मी कॉलनी परिसरात पदपथांसह थेट महामार्गावरच विविध व्यावसायिकांकडून अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन प्रवाशांना कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

रविदर्शन इमारत, आकाशवाणी परिसर, फॉर्च्युन इस्टेट परिसरात अनेक व्यावसायिकांनी व्यवसायासाठी पदपथ व महामार्गही काबीज केल्याचे चित्र दिसून येत आहे. खाद्यपदार्थाचे स्टॉल, कुशन मेकर्स, मांस विक्रीची दुकाने, चायनीज फूड सेंटर यांच्यासह विविध प्रकारची दुकाने पदपथावर थाटली जात आहेत. सायंकाळनंतर रात्री बारा वाजेपर्यंत त्याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. अनेक ग्राहक महामार्गावर वाहने उभी करून खरेदी किंवा खाद्य पदार्थ खात असतात. तसेच, इतर वाहनेदेखील या ठिकाणी तासन्‌ तास उभी केली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून, त्यांना महामार्गावरून वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

या अतिक्रमणांमुळे परिसरात वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यातच खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही महामार्गावर अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने त्यात आणखी भर पडत आहे. अनेक वेळा पंधरा नंबर ते रविदर्शनपर्यंत वाहतूक कोंडी होत असते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलिस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अतिक्रमणांमुळे पादचारी मार्गावर चालायला जागाच शिल्लक राहत नाही. यामुळे नागरिकांना किरकोळ कामासाठी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन पदपथ मोकळे करणे गरजेचे आहे.
-दिनेश शितोळे, रहिवासी

अतिक्रमणाबाबत आम्ही तहसीलदार व वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे. त्यांच्याकडून कारवाईचे सहकार्य अपेक्षित आहे. हे पदपथ मोकळे झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
-गणेश चवरे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

Web Title: manjri are and footpath