माऊलींच्या सोहळ्यातील मानकरी बाबूराव चोपदार यांचे निधन

randhawe.jpg
randhawe.jpg

आळंदी (पुणे) : आळंदी देवस्थानमधील मानकरी व श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वंश परंपरागत चोपदार कृष्णराव ऊर्फ बाबूराव वासुदेव रंधवे (वय 83) यांचे शुक्रवारी (ता. 16) कोरोनाने निधन झाले. गेली सत्तावीस दिवस पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आळंदी देवस्थानचे मानकरी व बांधकाम व्यावसायिक राजाभाऊ चोपदार, बांधकाम व्यावसायिक रामभाऊ चोपदार, लेखिका, प्रकाशक शैलजा मोळक, पुणे महापालिकेच्या सहायक शिक्षण प्रमुख शिल्पकला रंधवे यांचे ते वडील तर पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचे ते सासरे होत. कोरोनाचा संसर्ग झाल्याने वीस दिवसांपूर्वी बाबूराव चोपदार यांना रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येरवडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

"सकाळ'साठी मोठे योगदान 
आषाढी वारी आणि सकाळ हे अतूट नाते तयार करण्यामध्ये चोपदार गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे. "सकाळ'मध्ये त्यांनी अनेक वर्ष वारीचे वार्तांकन केले. इतकेच नाही तर वारीत चालताना "सकाळ'चे वितरणाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष संभाळळी. वारीत चालताना चुकलेल्या वारकऱ्यांना पुन्हा त्यांच्या दिंडीत पोच करण्यासाठी दिंड्यांच्या मुक्कामांची यादी तयार करण्याचे मोठे काम चोपदार गुरुजींनी केले. त्यांनी केलेल्या याच अनमोल कामामुळे चोपदार फाउंडेशन आणि सकाळ सोशल फाउंडेशनने यांच्या संयुक्त विद्यमाने "जाऊ देवाचिया गावा' हा उपक्रम अनेक वर्ष वारीत सुरू होता. 
 

बैलगाडी ते हायटेक आषाढी वारीचे चोपदार साक्षीदार होते. संत विचारांबरोबरच पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. वारीतील परंपरा टिकवीत काळानुरूप झालेले बदल स्वीकारण्यास त्यांचा कायम पाठिंबा राहिला. सातारा जिल्ह्यातील मार्डी (शिखर शिंगणापूर) येथे चोपदार गुरुजींचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण आळंदीत व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. कार्तिकी यात्रेत यात्राकर संकलक म्हणून काम केले. हार फूल, वृत्तपत्रही विकले. त्यानंतर 1958 मध्ये ते शिक्षक म्हणून नोकरीस लागले. सदतीस वर्षे त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळला. वाघाव (देशमुखवाडी), सोळू, मरकळ, भोसरी, पिसर्वे, गोलेगाव आणि आळंदी नगरपालिका शाळेत त्यांनी विद्यादानाचे काम केले. अनेक वर्षे त्यांनी विविध वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम केले. आळंदीतील ते पहिले पत्रकार होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचेही त्यांनी अनेक वर्षे वार्तांकन केले. वारीचे वार्तांकन करण्यासाठी येणाऱ्या नवीन पत्रकारांसाठी चोपदार गुरुजी मार्गदर्शक होते. अधिकारी असोत, राजकीय व्यक्ती असो वारीची परंपरा त्यांना समजावून सांगत. वारीत तरुणांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, यासाठी त्यांचा कायम आग्रह होता. वारीमध्ये पालखी सोहळ्याचे छापून आलेले वृत्तांकन वारकऱ्यांना वाचायला मिळावे यासाठी त्यांनी चोपदारकीचा मान सांभाळून वारीत वृत्तपत्राचे वितरण केले. वारी आणि आळंदीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह करण्याचा छंदही त्यांनी आजन्म जोपासला. आळंदी देवस्थानमध्ये वर्तमानपत्र भाविकांसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी नव्वदच्या दशकात पाठपुरावा करून देऊळवाड्यात वाचनालय उपलब्ध केले होते. 

चोपदार यांना जनगणना अधिकारी म्हणून 1971, 1981 मध्ये प्रशस्तिपत्रक आणि 1991 मध्ये रौप्यपदक मिळाले होते. तसेच 1991 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानकरी म्हणून ताम्रपट देवून विशेष सत्कार झाला होता. आर्थिक शिस्त प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे, यासाठी त्यांचा सतत आग्रह होता. याच भावनेतून त्यांनी देवस्थानमधील कर्मचाऱ्यांना पोस्टातील अल्पबचतीची खाती सुरू करून बचतीची सवय लावली. आषाढी वारीत तसेच आळंदी देवस्थामध्ये माऊलींच्या समाधीसमोर विविध नैमित्तिक आणि धार्मिक कार्यक्रमासाठी चोपदार म्हणून त्यांचा परंपरागत मान होता. वारी काळात दिंड्यांची यादी तयार करणे, वारीसाठीची पत्रव्यवहार करणे, मानाची कीर्तन प्रवचनाची यादी बनविणे, वारी काळात दिंड्यांना रॉकेल व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, वाहन पास योजना अशी अनेक कामे ते सातत्याने करत. त्यामुळे वारीत वारकऱ्यांना अनेक सुविधा सुलभपणे मिळण्यास मदत झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com