पराभवानंतरही येथे भाजपच्या पदासाठी मोठी चुरस 

bjp
bjp

पुणे : विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या शिरूर व इंदापूर मतदारसंघात भाजपमध्ये पदाधिकारी निवडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. इंदापूर शहराध्यक्षपदासाठी 10; तर शिरूर तालुकाध्यक्षपदासाठी 23 जण इच्छुक आहेत. या इच्छुकांमध्ये एकमत न झाल्याने निवडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्याचे ठरले आहे. 

इंदापूरला शहराध्यक्षपदासाठी दहा जण रिंगणात
इंदापूर : शहर भाजपच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चुरस दिसत आहे. पदासाठी एकूण 11 जण इच्छुक होते. मात्र, त्यातील एकाने माघार घेतल्याने 10 जण शर्यतीत उरले आहेत. 

इंदापूर शहर भाजपचे अध्यक्ष माउली वाघमोडे यांची मुदत संपल्याने त्यांच्याजागी नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी पक्षाने निवड प्रक्रिया सुरू केली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. नितीन भामे, तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर चवरे, दूध गंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील, वाहतूक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत यांच्या उपस्थितीत इंदापूर अर्बन बॅंक सभागृहात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या वेळी नवीन बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सक्रिय सदस्य, शहर मंडल अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार उपस्थित होते. 

इंदापूर शहर संघटनात्मक निवडणूक मंडल अध्यक्षपदाकरिता गणेश पांढरे, चॉंद पठाण, पांडुरंग शिंदे, अशोक इजगुडे, शकील सय्यद, रफीक बागवान, सागर गानबोटे, गोरख शिंदे, हर्षवर्धन कांबळे, सागर भोंग, सिकंदर बागवान हे उमेदवार इच्छुक होते. या वेळी रफीक बागवान यांनी अर्ज माघारी घेऊन पक्ष संघटनात्मक जी जबाबदारी देईल, ती पार पाडण्याची ग्वाही दिली, त्यामुळे दहा जणांत चुरस आहे. 

शिरूरमध्ये 23 जण इच्छुक 
शिक्रापूर :
 शिरूर भाजपच्या तालुकाध्यक्षपदासाठी तब्बल 23 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत काही तास चर्चा होऊनही एकवाक्‍यता न झाल्याने निवडीचा चेंडू अखेर वरिष्ठ पातळीवर टोलविण्यात आला. 

विधानसभा निवडणुकीत 41 हजारांनी पराभव स्वीकारावा लागल्याने शिरूर भाजप संघटनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याच पार्श्‍वभूमीवर तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन अध्यक्षपदासाठी मंगळवारी (ता. 3) पक्ष निरीक्षक तानाजी दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी 23 जणांनी आपले अर्ज सादर केले. यात किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रदीप सोनवणे, भाजप सरचिटणीस गोरक्ष काळे, रामचंद्र निंबाळकर, जयेश शिंदे, युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मांढरे, पंढरीनाथ गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ, अनिल नवले आदी प्रमुख इच्छुकांसह एकूण 23 जण इच्छुक म्हणून पुढे आले. मात्र, यातील एकाही नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सर्व इच्छुकांची यादी पाठविल्याची माहिती मावळते तालुकाध्यक्ष शेळके यांनी दिली. 

याबाबत लवकरच माजी आमदार बाबूराव पाचर्णे, शिरूर-हवेलीचे संघटक धर्मेंद्र खांडरे, प्रदेश प्रतिनिधी शिवाजी भुजबळ, श्‍याम चकोर आदी योग्य तो निर्णय घेतील आणि वरिष्ठ पातळीवर अंतिम तालुकाध्यक्ष निश्‍चित होईल, अशी माहितीही शेळके यांनी दिली. 

मला कळू दिले नाही - पाचंगे 
सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन पारदर्शी कारभार म्हणून भाजपमध्ये मी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रवेश केला. मात्र, मी तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुक असतानाही मला ही प्रक्रिया कळू दिली नसल्याची तक्रार क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली. याबाबत आपणही वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com