'नीट'ला वेळ पडला अपुरा; 'ओएमआर'शीट भरण्यात विद्यार्थ्यांचा गेला वेळ!

NEET_OMR_Sheet
NEET_OMR_Sheet

पुणे : ''खरं तर मी 'नीट'चा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केला होता, पेपर सोपाही गेला, पण सुरूवातीला ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन (ओएमआर) शीट भरण्यात वेळ गेला आणि माझे फिजिक्‍सचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ उरला नाही. सर्व प्रश्‍न सोडविता यावेत यासाठी गोंधळ उडतो,'' असे नीटची परीक्षा देणारी श्रुती सांगत होती.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'नीट' प्रवेश परीक्षा रविवारी (ता.13) घेण्यात आली. नोंदणी केलेल्या 15 लाख 97 हजार विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 'कोरोना'मुळे मे महिन्यात होणारी 'नीट'ची परीक्षा सप्टेंबर महिन्यात झाली, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चार महिने जास्त मिळाले. त्यामुळे चांगला अभ्यास करता आला. पण थेट वर्गात सराव नसल्याने काही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

दरवर्षीप्रमाणे परीक्षेच्या आधी इन्स्टिट्यूट किंवा महाविद्यालयातर्फे नीट परीक्षा देणाऱ्या मुलांची प्रत्यक्षात सराव परीक्षा घेता आली नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन 'ओएमआर'शीट भरण्याचा पूर्ण सराव झाला नाही, पण त्याचा जास्त उपयोग झाला नाही.

डिपरचे संस्थापक सचिव हरीश बुटले म्हणाले, ''जर परीक्षा ही ऑफलाइन असेल, तर पेपर सोडविण्याचा सराव ऑफलाइनच केला पाहिजे. ऑनलाइन सराव करून उपयोग होत नाही. नीट परीक्षेमध्ये यंदा यामुळे अनेक विद्यार्थ्यांना 'ओएमआर' शीट भरताना वेळ लागला आहे, त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होणार आहे. डीपरच्या सराव परीक्षेत 710 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यालाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'ऑफलाइन पेपर सोडविण्याचा सराव केला पाहिजे.''

श्रुती वाडेकर म्हणाली, ''आमचा जो गोंधळ झाला, तो पुढच्या वर्षासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा होऊ नये. यासाठी त्यांनी परीक्षेची तयारी करताना घरीच 'ओएमआर' शीट भरण्याचा सराव करावा केला पाहिजे.''

सर्व धड्यांवर विचारले गेले प्रश्‍न
यंदाच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयातील सर्व धड्यांवर प्रश्‍न विचारण्यात आले होते.
भौतिकशास्त्रात काही प्रश्‍न अभ्यासक्रमाबाहेरील होते, पण ते विद्यार्थ्यांनी सहज सोडविले. जीवशास्त्रात वनस्पतीशास्त्रावर 42 प्रश्न होते, त्यापैकी अनुवंशशास्त्र (जेनेटिक्‍स) व पर्यावरणशास्त्र (इकॉलॉजी) मधून प्रत्येकी 7 ते 4 प्रश्न होते. पेशी विभाजन, रफॉलॉजी यावर सुद्धा बरेच प्रश्न होते.

प्राणिशास्त्रामध्ये बायोमॉलिक्‍युल, सामान्य (जीवशास्त्र) (किंगडम ऍनिमेलिया), मानवी पुनरुत्पादन (ह्यूमन रिप्रोडक्‍शन), रिप्रोडक्‍शन हेल्थ, बायोटेक्‍नॉलॉजी यावरील जास्त प्रश्न होते. रसायनशास्त्रात सेंद्रिय रसायनशास्त्रावर 13-14 प्रश्न, तर भौतिक रसायनशास्त्रवर 13-14 प्रश्न विचारण्यात आले होते, असे एलन करिअर इन्स्टिट्यूटचे शैक्षणिक प्रमुख अरुण जैन यांनी सांगितले.

एकूण गुण - 720
एकूण प्रश्‍न - 180
भौतिकशास्त्रावरील प्रश्‍न - 45
रसायानशास्त्रावरील प्रश्‍न - 45
जीवशास्त्रावरील प्रश्‍न - 90

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com