Maratha Reservation : मराठ्यांना उद्रेकातून नाही तर शांततेतूनच आरक्षण; मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

राजगुरुनगर येथे १ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी १०० एकरावर जरांगे पाटील सभा आयोजित करण्यात आली होती.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSakal

राजगुरुनगर - मराठ्यांनी उचकावे यासाठी षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे हा काळ आपल्या कसोटीचा आहे. आरक्षणाचा घास आपल्या जवळ आलेला असून, उद्रेक होऊ देऊ नका, आत्महत्या करू नका. परत अशी संधी परत येणार नाही. शांततेच्याच युद्धाने आपल्याला आरक्षण मिळणार आहे, असे आवाहन करत २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, त्यानंतर सुरू होणारे आंदोलन शांततेच असले तरी ते तुम्हाला झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

राजगुरुनगर येथे १ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी १०० एकरावर जरांगे पाटील सभा आयोजित करण्यात आली होती. तुडूंब भरलेल्या या मैदानात जरांगे पाटील यांनी त्यांच्या खास ग्रामीण शैलीत तडाखेबाज भाषण करत उपस्थित मराठा समाजाच्या काळजात हात घातला. भाषणात त्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणारे नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता टीका केली.

जरांगे पाटील म्हणाले, 'आंतरवाली सराटीची सभा झाल्यानंतर मराठे पुन्हा एकत्र येणार नाहीत असे अनेकांना वाटले होते. पण राजगुरुनगरची सभा पाहिल्यानंतर मराठा जागृत झाला आहे हे त्यांना लक्षात येईल. मुंबई येथे आपल्या एका मराठा भावाने आत्महत्या केली, गेल्या दीड महिन्यात १५ तर यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ४७ मराठा तरुणांनी आत्महत्या केली आहे.

वेळेत आरक्षण न मिळाल्याने या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकार जबाबदार आहे. त्यांचे हे बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणाचा लढा सुरु झाल्यानंतर काही जणांनी आपण ठोकाठोकी सुरू करू असे सांगितले होते. पण मी त्या स्पष्ट नकार देत शांततेच्या युद्धानेच आरक्षणाचा निर्णय होणार आहे. जोपर्यंत आरक्षण घेत नाही तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही, माझ्या समाजासोबत गद्दारी करणार नाही.

मला स्वागताचे हार घेण्यासाठी दौरे करत नाही तर मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाहीत म्हणून गावागावात फिरत आहे. आम्ही सरकारला ३० दिवसांऐवजी ४० दिवसांची मुदत दिली होती, २४ आक्टोबरला ही मदत संपत असल्याने सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.

मराठ्यांनी दिवसरात्र काबाड कष्ट करून, कर्ज काढून मुलांना शिकवले आहे. पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही. मराठा समाज आरक्षणाच्या मुळापर्यंत आपण गेलो नाही. त्यामुळे आपण मागे पडलो. ज्या समाजाला आरक्षणाचे फायदे कळाले तो समाज खूप पुढे गेला आहे.‌ मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरक्षण विषय कळायला पाहिजे. त्यासाठी घरोघरी जाऊन हा विषय लोकांना समजून सांगा. असे पाटील यांनी सांगितले.

पोटजात म्हणून आरक्षण मिळवले

मंडल आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जाती निश्चित केल्यानंतर ओबीसीतील पोट जात म्हणून इतर जातींची कागदपत्र न तपासता, थेट आरक्षण देऊन टाकले. याबाबत मंत्री मंडळातल्या मंत्र्यांकडे उत्तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ विदर्भात आहे, तेथील मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळते मग उर्वरित मराठा समाजाला का मिळत नाही?. मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हणले की सरकारला आयोग, समिती, अभ्यास हे सगळं आठवतं. पण आता या सरकारला सुट्टी नाही.

जरांगे-पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- माझी भूमिका आडमुठी नाही, समाजाचे भले व्हावे यासाठीच सरकारला ४० दिवसाची मुदत दिली.

- १७ दिवसाच्या उपोषणामुळे माझी तब्येत बरी नाही, पण आता थांबलो तर आरक्षण मिळणार नाही म्हणून दौरे सुरु आहेत.

- ओबीसीमध्ये आरक्षण देणे शक्य नसेल तर ५० टक्क्याच्या आता टिकेल असे आरक्षण द्या

- असे आरक्षण देता येत नसेल तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या.

- मराठा हा कुणबी आहे असे सांगणारा जीआर २००४ काढला होता, त्या आधारावर आरक्षण देताना वंशावळीचे पुरावे मागण्यात आले होते त्यावर हरकत घेतल्यानंतर सरकारने अद्यापही उत्तर दिले नाही.

तरुणाचा आत्महत्येचा इशारा

जरांगे पाटील यांचे भाषण संपताच एक तरुण व्यासपीठावर आला. त्याने हातामध्ये माईक घेऊन मला काहीतरी बोलू द्या नाही तर मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली. त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी व कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेतले. जरांगे पाटील यांनी त्यास काही करू नका असे सांगत त्याच्याशी संवाद साधला. तो शांत झाल्यानंतर त्याला सोडून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com