#MarathaKrantiMorcha जुन्नरला शासकीय कार्यालयासह व्यावसायिकांचा बंदमध्ये सहभाग 

दत्ता म्हसकर
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. 

जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. 

एस.टी.बसस्थानके ओस पडली होती.प्रशासनाने तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आज शाळांना सुटी देण्यात आली होती. सकाळी तालुक्याच्या विविध गावातून मराठा समाज बांधव मोटारसायकल रॅलीने एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत भगवे झेंडे घेऊन जुन्नरला आले. शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला. 

यात महिला, युवक, व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पाच हजाराहून अधिक समाज बांधव आरक्षणाची मागणी करत मोर्चात सहभागी झाले होते. आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, युवक नेते अतुल बेनके, शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके सहभागी झाले होते. या आंदोलनास विविध संस्था, व्यापारी संघटना यांनी पाठींबा दिला होता. 

जुन्नर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी ऋषिकेश काळे, सायली दुराफे, प्रीतम ढमाले या विदयार्थ्यांची आरक्षणाच्या विषयावर भाषणे झाली. आरक्षणाच्या प्रश्नांसाठी बलिदान केलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मढ येथील रस्ता रोको आंदोलन प्रकरणी युवकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मोर्चाच्या वतीने यावेळी मागणी करण्यात आली ती प्रशासनाने मान्य केली. तहसीलदार किरण काकडे यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले मराठा समाजाच्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येतील असे सांगितले. मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयक रमेश हांडे व मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील ढोबळे यांनी संयोजन केले. पोलीस निरीक्षक सुरेश बोडखे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Junnar participated in the band of the professional offices and professionals