#MarathaKrantiMorcha दौंड शहरात मराठा मोर्चाला हिंसक वळण

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 26 जुलै 2018

दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे. 

दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे. 

दौंड शहरात आज (ता. २६) सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळितपणे सुरू होते. शाळा, महाविद्यालय, बॅंका व इतर व्यावसायिक प्रतिष्ठाण नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने वर्दळ होती. परंतु अचानकपणे सकाळी ११ वाजता रेल्वे उड्डाण पूल येथे पाटस - दौंड - बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनामुळे दौंड - बारामती, दौंड - नगर व दौंड - पाटस रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दौंड शहराजवळच्या सोनवडी, गार , गिरीम, बेटवाडी येथील मोर्चातील युवकांनी घोषणाबाजी करीत व्यापारपेठ बंद पाडली. पूर्वसूचना नसल्याने अनेक दुकानदारांना दुकाने बंद करता आली नाही व त्यामुळे काही युवकांनी उघड्या दुकानांवर दगडफेक केली. दुचाकी वाहनांवर हातात भगवे झेंडे व दगडे घेऊन फिरणार्या जमावामुळे बाजारपेठेत आलेले सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी व व्यापारी यांची धांदल उडाली. 

रेल्वे उड्डाण पुलाच्या येथे दुचाकीवरील युवती व मुलांसमवेत असलेल्या महिलांना प्रारंभी जाऊ देण्यात आले नाही परंतु समाजातील वरिष्ठांनी तंबी दिल्यानंतर महिलांसाठी रस्ता खुला करण्यात आला. 

दौंड - नगर महामार्गावरील नानवीज फाटा येथे आंदोलकांनी टायर पेटविल्याने ते विझविण्यासाठी गेलेला दौंड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर दौंड - श्रीगोंदे या एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या. 

जमावाने घोषणाबाजी करीत मुख्य बाजारपेठेसह दौंड - गोपाळवाडी रस्त्यावरील दुकाने बंद पाडली. पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने हुल्लडबाजी करीत मोजक्या समाजकंटकांनी दगडफेक करीत भितीचे वातावरण तयार केले. मोर्चाच्या दरम्यान दुपारी साडेअकरा ते सव्वाबारा या काळात शाळेची वेळ असल्याने आणि प्रमुख रस्ते बंद असल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली. 

जनता कॅालनी येथील ऋतुविहार अपार्टमेंट मधील मोना मिनी मार्केटचे श्री. खैरे नामक दुकानदाराच्या तोंडावर दगड मारून त्यांना दुचाकीवरील जमावाने गंभीररित्या जखमी केले.

पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २४ जुलै रोजी शांतता समितीची बैठक घेतली होती. आजच्या मोर्चात दौंड शहराशेजारील गावांमधील बहुसंख्य  युवक सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या काही पदाधिकार्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाची सांगता करण्यात आली. दगडफेकीच्या घटनानंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

Web Title: MarathaKrantiMorcha A violent turn of the Maratha Morcha in the Daund