मराठीत काम करणे ठरते कमीपणाचे - नीना कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

पुणे -  ‘‘हिंदीतील कलाकार स्वेच्छेने दूरचित्रवाणीत काम करण्यासाठी येतात. या कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तरीही ते नाकारतात. दुर्दैवाने मराठीत हे चित्र पाहायला मिळत नाही. मराठी दूरचित्रवाणीत काम करणे आजही कमीपणाचे मानलं जाते,’’ अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

पुणे -  ‘‘हिंदीतील कलाकार स्वेच्छेने दूरचित्रवाणीत काम करण्यासाठी येतात. या कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तरीही ते नाकारतात. दुर्दैवाने मराठीत हे चित्र पाहायला मिळत नाही. मराठी दूरचित्रवाणीत काम करणे आजही कमीपणाचे मानलं जाते,’’ अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

अभ्यंकर परिवार आणि अभ्यंकर मित्र परिवार यांच्या वतीने मराठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे पडद्यामागील कलाकार विठ्ठल नामदेव हुलावळे यांना कुलकर्णी यांच्या हस्ते ‘आनंदरंग’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी अहिल्यादेवी अभ्यंकर, अंजली अभ्यंकर उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यानंतर उत्तरार्धात नीना कुलकर्णी यांची विनिता पिंपळखरे यांनी प्रकट मुलाखत घेतली. यातून कुलकर्णी यांचा जीवनप्रवास उलगडला. 

त्या म्हणाल्या, ‘‘वेगवेगळ्या कॅनव्हासवर जाऊन काम करावे, असे मला स्वत:हून वाटले तेव्हाच मी वेगळ्या माध्यमात काम करण्यासाठी गेले. माध्यमाचा विचारपूर्वक अभ्यास करूनच मी अभिनय करते. एका वेळी एक भूमिका करणे मला पसंत आहे. कारण, त्यामुळे संबंधित व्यक्तीरेखेत मनापासून शिरता येते.’’

‘‘अभिनयाला सुरवात करून ४५ ते ५० वर्ष झाली; पण अजूनही ही सर्व प्रक्रिया मला फॅसिनेट वाटते. विजयाबाई (ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता) ‘द सर्च ऑफ परफॉर्मन्स’ असं नेहमी म्हणायच्या. त्याप्रमाणे माझा शोध अद्याप सुरू आहे; पण हा शोध आता ‘प्रावीण्य’तेकडे आहे. अभिनय करायचा म्हटलं तर ‘मॅडनेस’ हवाच. कलाकारातील शोध सुरू असतो, तोपर्यंत त्याला मरगळ किंवा कंटाळा येत नाही. खरंतर भूमिकेला कलाकार आत्मा देतो, हे प्रत्यक्षात करणे आणि साकारणे अवघड असते,’’ असेही कुलकर्णी म्हणाल्या.

मराठीत काम करणे म्हणजे माहेरी आल्यासारखे वाटते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी या माध्यमातील अर्थकारणात बराच फरक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. मित्रपरिवारातील मंडळींनी आनंद अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.

Web Title: marathi acting do is infra-dig