#माझी मराठी परिवर्तनाच्या टप्प्यावर ‘मराठी’ बदलतेय

#माझी मराठी  परिवर्तनाच्या टप्प्यावर ‘मराठी’ बदलतेय

पुणे - घटना क्रमांक १ : इंग्रजी माध्यम शाळेत ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांची मराठीची लेखी परीक्षा झाल्यावर पेपर तपासणीचे काम चालू आहे. त्या वेळी उत्तरपत्रिकेत आढळून आलेल्या गोष्टी...  आई घरी नसताना मला आईची ८van येत होती. आई मला कायम वेळेत j१ देते.

घटना क्रमांक २ :   महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या ग्रुपमधील संवाद
मुलगा - परीक्षेला चालली आहेस ना, ऑल द बेस्ट!
मुलगी - हो. थॅंक्‍स आणि s२u.

मराठी भाषेचे असे विद्रूपीकरण अनेक मराठी कुटुंबामध्ये दिसते. १४ ते ३० वयोगटांतील कित्येकांकडे सलग १० मिनिटे मराठीत बोलण्याची क्षमताही नसते. बदलत्या पिढीनुसार वेगवेगळे शब्दप्रयोग, नवनवीन संकल्पना येत राहतात, परंतु सोयीनुसार वरील घटनांप्रमाणे पळवाटा हास्यास्पद आहेत. हे दुष्टचक्र कदाचित न संपणारे आहे. परंतु या नवमाध्यमांचा प्रभाव ओळखून ‘मराठी’त काही गोष्टी स्वीकारायला हव्यात असे अनेक तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे या युगात अनेक संदर्भांचा अभ्यास करून भाषेला परिवर्तनाच्या टप्प्यावर आणणे गरजेचे आहे. खरे तर भाषेची असर्जनशील मोडतोड करण्यापेक्षा अनेक नवीन गोष्टी आत्मसात करून ती समृद्ध करण्याचे भाग्य आजच्या पिढीला मिळाले आहे, असे म्हणायला हवे. 

फेसबुक, व्हॉट्‌सॲपसारखी माध्यमे आली. त्यावरील असंख्य मीम्समुळे आणि अनेक वेबसाइटवरील मोडक्‍या तोडक्‍या मराठीच्या प्रभावामुळे शाळा, महाविद्यालयांमधील परीक्षेच्या 

उत्तरपत्रिकेतही अशी भाषा दिसायला लागली. नवमाध्यमांमुळे मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्या संधीचे सोने करणे तुमच्या-आमच्याच हातात आहे असे अनेकांचे मत आहे.

दत्तात्रय आव्हाड (पालक, शिक्षक) - माझा मुलगा पहिलीत शिकतो. पबजी, गेम्स, असे शब्द त्याच्या तोंडी सर्रास असतात. परंतु बदलत्या काळात मराठीसाठी प्रशासन, शाळा आणि पालक अशा सर्व स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत.

पर्णवी देवी (नोकरदार तरुणी) - रोजच्या व्यवहारात फक्त मराठी भाषाच वापरणे शक्‍य नाही. माध्यमे प्रचंड वेगाने बदलत आहेत. त्यामुळे जर मराठीत काही संदर्भ, नवनवीन संकल्पना, शब्द अंतर्भूत झाले तर ती अजून समृद्ध होईल.

प्रा. हरी नरके (समन्वयक, अभिजात मराठी भाषा समिती) - भाषेची मोडतोड नेहमीच होते, परंतु आळसाने ती कुरूप करणे हास्यास्पद आहे. नवीन पिढीतल्या लेखक, कवींकडे अनेक समीक्षकांचे लक्ष नाही. त्यासाठी काही उपक्रमशील पर्याय उपलब्ध करायला हवेत. मराठीत काम केलेल्या लोकांच्या यशोगाथा समोर यायला हव्यात. 

सुबोध कुलकर्णी (समन्वयक, सेंटर फॉर इंटरनेट ॲण्ड सोसायटी) - अर्धवट आंग्लाळलेल्या लोकांकडून मराठीचे विद्रूपीकरण होत असते. परंतु अनेक लोकांकडून इंटरनेटवर मराठीतून माहिती शोधण्याचा कल आहे. मराठी की-बोर्डचा वापर वाढवून मराठीतून प्रतिक्रिया द्यायला हव्यात.

विवेक सावंत (व्यवस्थापकीय संचालक, एमकेसीएल) : मराठी भाषा इंटरनेटवर वापरताना बोटांचा कमीत कमी वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. इंटरनेटवर स्पीच टू टेक्‍स्ट या सोयीमुळे वापरात अधिक प्रगल्भता आली आहे. तसेच भिन्न संस्कृतीतील शब्द मराठी भाषेने सामावून घेणे आवश्‍यक आहे.

भाषेसाठी कुठल्याही प्रकारचा अट्टहास चुकीचा आहे. अर्धवट भाषा बोलणे हास्यास्पदच आहे. परंतु भाषा जशी वळत जाईल तशी अंगीकारणे गरजेचे आहे.
- संदीप खरे, कवी

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com