...म्हणून मराठी साहित्य उच्च नाही ! - काळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘मराठी लेखक त्यांच्या अनुभुतीशी, अनुभवाशी प्रामाणिक राहत नसल्याने आणि त्यांची आत्मनिष्ठा जपत नसल्यानेच त्यांच्याकडून उच्च प्रतीची साहित्य निर्मिती घडू शकत नाही. या मर्यादांवर काम झाल्यास मराठी साहित्यही जागतिक परिघावर आपला स्वतंत्र ठसा नक्कीच उमटवू शकेल,’’ असे मत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी शनिवारी काळे बोलत होते. या वेळी लोकसंस्कृतीचे अभ्यासक व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. ता. भोसले, महापौर प्रशांत जगताप, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, ‘ वाङ्‌मयीन संस्कृतीचा विकास व्हायचा असेल, तर केवळ भरमसाट साहित्यनिर्मिती हे उद्दिष्ट न ठेवता श्रेष्ठ साहित्य निर्मितीकडे लेखकांचा प्रवास झाला पाहिजे. अवघे विश्व जाणून घेण्याची ओढ लेखकात हवी. केवळ आपल्याच परिघात फिरत किंवा आपल्याच खुशमस्कऱ्यांच्या गरड्यात वावरत उच्च प्रतिचे साहित्य कधीच निर्माण होऊ शकत नाही !‘
भोसले म्हणाले,‘‘समाजातील शेतकरी आणि साहित्यिक या दोन घटकांची सध्या समाजात अवहेलना होत असून, त्यांना योग्य तो मान मिळत नाही. हे चित्र बदलले पाहिजे. आज क्रांती केवळ शेतकरी आणि साहित्यिकच घडवून आणू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.’’

दरम्यान, संमेलनाच्या उद्‌घाटन सत्राआधी संस्कृती प्रकाशनातर्फे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तसेच, मुरली लाहोटी यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटनही या वेळी करण्यात आले.

या वेळी क्रीडा लेखक संजय दुधाने, ज्योती देसाई, वि. दा. पिंगळे, देवेंद्र सूर्यवंशी, सतीश सुरवसे, शशिकांत देवकर यांची पुस्तके प्रकाशित केली. आंबेडकर यांच्या जीवनावरील शोधनिबंध लंडन येथे सादर केल्याबद्दल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. शैलेश त्रिभुवन यांचा सत्कार करण्यात आला. देवंद सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Web Title: Marathi literature is not as high ...