रोज 85,500 लिटर पाणीबचत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

बेसिनमध्ये भांडी वा हात धुताना अधिक पाणी वाया जाते. नळ अर्धवट ठेवल्यास पाण्याचा दाब वाढतो. त्यामुळे पाणी वाचविणारे एरेटर बसविले. आता तेवढ्याच वेळेत पाणी कमी लागते. 
- प्राजक्ता रुद्रावर, रहिवासी

वाल्हेकरवाडी - रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीतील नागरिकांनी सदनिकांमधील ९५० नळांना स्वखर्चातून एरेटर बसविले. यामुळे दररोज साधारणतः ८५ हजार ५०० लिटर पाणीबचत होत आहे. 

एरेटर बसविलेल्या नळाद्वारे पाणी येत असताना आपली नेहमीची कामे सुरू राहतात. म्हणजेच कमी पाण्यात रोजच्या इतकीच कामे होतात. त्यामुळे जादा वेळ लागत नाही, असे सेलेस्टियल सिटी सोसायटीतील महिलांनी सांगितले. नळांना एरेटर बसविण्यासाठी केतकी नायडू, नझला मल्लाही, रोशनी रॉय, सुस्वागता रॉय, प्राजक्ता रुद्रावर, शांती नेझर, नम्रता श्रीवास्तव, अर्पिता मंडल, मनोज गर्ग, रोशिथ रवींद्रन, निखिल एस., शशी रामक्रिष्णन, पल्लवी करंदीकर, स्मिता देठे, पूनम झुनझुनवाला, पूनम अलगुरे, नताशा काटे यांनी प्रयत्न केले.
काय आहे नळ एरेटर

नळ एरेटरला प्रवाह नियंत्रक म्हणतात. ते पाणी वाचविणारे उपकरण असून, नळाच्या शेवटी बसविले जाते. त्यामुळे नळात आपोआप हवा भरून पाण्याचा दाब कमी होतो. चाळणीच्या रूपातही तो काम करतो. एक प्रवाह छोट्या छोट्या प्रवाहांमध्ये टाकला जातो. त्यातून पाणी जाण्यासाठी कमी जागा लागत असल्याने प्रवाह कमी होऊन पाण्याची बचत होते. 

नळ एरेटर का वापरावे?
नळ एरेटर हे बहुतांशी गळणारे, जास्त पाणी सोडणाऱ्या नळांसाठी वापरले जाते. जुन्या टॅपमध्ये एरेटर जोडल्यास प्रतिमिनिट पाण्याचा प्रवास सहा लिटरने कमी होतो. बाथरूम वा किचनमध्ये सर्वांत जास्त पाणीबचत होऊ शकते. एरेटर स्वस्त व वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध असून, आपण स्वत: बसवू शकतो.

अशी होते पाणीबचत
एका सदनिकेत दर मिनिटाला येणारे पाणी    :    १२ लिटर
एरेटर बसविल्यानंतर दर मिनिटाला पाणी    :    ३ लिटर
एका नळाद्वारे दर मिनिटाला पाणीबचत    :    ९ लिटर
दहा मिनिटे नळ सुरू राहिल्यास पाणीबचत    :    ९० लिटर
९५० सदनिकांमध्ये दररोज पाणीबचत    :    ८५,५०० लिटर

Web Title: marathi news 85500 leter water saving