महात्मा गांधींना हवं होतं अहिंसक विज्ञान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

टाकाऊ वस्तूंपासून विज्ञान खेळणी घडवायची चळवळ सुरू करणाऱ्या अरविंद गुप्ता यांना ‘पद्मश्री’ सन्मान नुकताच जाहीर झाला. गुप्ता यांच्यावर असलेल्या महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव जाणून घेऊ, नीला शर्मा यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतून.

टाकाऊ वस्तूंपासून विज्ञान खेळणी घडवायची चळवळ सुरू करणाऱ्या अरविंद गुप्ता यांना ‘पद्मश्री’ सन्मान नुकताच जाहीर झाला. गुप्ता यांच्यावर असलेल्या महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव जाणून घेऊ, नीला शर्मा यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतून.

प्रश्‍न - महात्मा गांधींचा यंत्रांना विरोध होता. मग विज्ञानाच्या प्रगतीचं काय ?
गुप्ता -
 महात्मा गांधींचा विरोध विज्ञानाला नव्हता. औद्योगिक क्षेत्राचं यांत्रिकीकरण झाल्याने बेरोजगारी वाढेल, हे त्यांचं म्हणणं होतं. उलट शिवणयंत्र वापरणाऱ्यांची ते बाजू घेत, कारण त्यामुळे रोजगाराला चालना मिळते, असं ते म्हणत. बापूजींना विज्ञान हवं होतं ते लोककल्याणासाठी उपयुक्त ठरू शकण्याच्या भूमिकेतून आणि अहिंसामय पद्धतीचं. गांधी विचारांचा नव्याने अभ्यास करणारे किती तरी विचारवंत आवर्जून सांगतात की, आज गांधीजी असते तर त्यांनी इंटरनेट या माध्यमाचा नक्कीच पुरस्कार केला असता. प्रचंड वेगात, असंख्य लोकांमध्ये जनहिताच्या विचारांचं आदानप्रदान करण्यासाठी हे तंत्रज्ञान त्यांना क्रांतिकारक वाटलं असतं.

प्रश्‍न - मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी काय करायला हवं ?
गुप्ता -
 शिक्षकांच्या योगदानाची गरज सगळेच सांगतात. ते गरजेचं आहेच, पण आई-बाबांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. मुलांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी पालक विज्ञान विषयातील पदवीधर असायलाच हवेत असंही नाही. मुलांचा ओढा विज्ञानाकडे वाढावा म्हणून पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं. मुलं विज्ञानाचे करत असलेले प्रयोग आई-बाबांनी कौतुकानं पाहावेत. मुलांकडून ते समजावून घ्यावेत. यामुळे मुलांचा उत्साह पराकोटीचा वाढेल.

प्रश्‍न - आपल्या दृष्टिकोनातून ‘संस्कार’ म्हणजे नेमकं काय ?
गुप्ता -
 पुस्तकांतल्या गोष्टींमधून संस्कार म्हणजे नैतिक मूल्य, वाइटावर चांगल्या वर्तणुकीने मात वगैरे मनावर बिंबवलं जातं. मूल्य सांगण्यासाठी ते योग्य आहेच. मात्र केवळ सांगण्यातून संस्कार घडत नसतात तर प्रत्यक्ष स्वतःच्या आचरणातून संस्कारांचा परिणाम अधिक होतो. तुमचं भलंबुरं वागणं पाहून मुलं त्याचं अनुकरण करतात. वडील घरच्या कामांमध्ये आईला मदत करताना दिसले तर मुलांमध्ये समानता आणि घरातली कामं करणं, स्वावलंबन, परस्पर सहकार्य, सामंजस्य आदी अनेक मूल्य पोचतात. सर्वांचा सहवास व प्रेमाची भावना वाढीस लागते. घरातली धुणीभांडी करणारी व्यक्ती, कचरा नेण्यासाठी आलेली माणसं, रस्ता झाडणारे तसंच गटार साफ करणाऱ्या लोकांबद्दल आई-बाबांच्या वागण्या-बोलण्यात माणुसकी दिसली तर मुलं ती सहजपणे आत्मसात करतात.

प्रश्‍न - मुलांना उत्तम पुस्तकं व चित्रपट उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल ?
गुप्ता -
 जगभर उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले गेले आहेत. मसाला चित्रपट किंवा कार्टूनपटांची मर्यादित कक्षा ओलांडून जागतिक पातळीवरचे दर्जेदार चित्रपट, माहितीपट व लघुपटांचा भला मोठा साठा इंटरनेटवर उपलब्ध आहे. याचा लाभ हवं तेव्हा, हवं तिथे बसून मनमुराद घेता येऊ शकतो आणि तोही विनामूल्य. पुस्तकं पुरवणारीही कित्येक संकेतस्थळं आहेत. उदाहरणार्थ, ब्रु ईस्टर काहले द्वारा निर्मित ‘आर्काईव्ह डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर सुमारे दीड कोटी पुस्तकं उपलब्ध आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे, सरसकट सर्वांना खुली नसणारी, सर्वाधिकार सुरक्षित असलेली, जागतिक पातळीवर दर्जेदार ठरलेली ५० लाख पुस्तकं या ठिकाणी वाचायला मिळतात. ती डाउनलोड करता येत नाहीत. मात्र, दृष्टिबाधितांना जगातली उत्कृष्ट पुस्तकं कुणी वाचून दाखवावीत, या उद्देशानं ती उपलब्ध आहेत. अशा विविध संकेतस्थळांवरील असंख्य पुस्तकं केवळ मुलंच कशाला, मोठ्या माणसांनीही वाचावीत.

Web Title: marathi news arvind gupta interview mahatma gandhi science