आवाजाच्या दुनियेतील करिअरच्या संधी या विषयावर संवाद

मिलिंद संगई
शनिवार, 10 मार्च 2018

बारामती (पुणे) : रुळलेल्या वाटेवरुन जात करिअरच्या संधी शोधण्यापेक्षाही नव्या वाटा चोखाळून वेगळ आयुष्य जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा वेगळा आनंद मिळतो. आवाजाच्या क्षेत्रात तुम्ही करिअर निश्चितपणे करु शकता, असे प्रतिपादन डबिंग आर्टिस्ट व निवेदक मेघना एरंडे जोशी यांनी केले. 

बारामती (पुणे) : रुळलेल्या वाटेवरुन जात करिअरच्या संधी शोधण्यापेक्षाही नव्या वाटा चोखाळून वेगळ आयुष्य जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा वेगळा आनंद मिळतो. आवाजाच्या क्षेत्रात तुम्ही करिअर निश्चितपणे करु शकता, असे प्रतिपादन डबिंग आर्टिस्ट व निवेदक मेघना एरंडे जोशी यांनी केले. 

येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया तसेच विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिबिंब अंतर्गत आवाजाच्या दुनियेतील करिअरच्या संधी या विषयावर शनिवारी (ता. 10) मेघना एरंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपसभापती शारदा खराडे, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक या प्रसंगी उपस्थित होते. 

फोरमच्या वतीने संगीता काकडे यांनी मेघना एरंडे यांच्याशी संवाद साधला. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हे क्षेत्र कसे वेगळे आहे या बाबत वेगळी माहिती देण्याचा मेघना एरंडे यांनी प्रयत्न केला. आवाजाच्या क्षेत्रात मेहनत केल्यास कशा पध्दतीने पुढे जाता येते, कोणत्या क्षेत्रात तुम्ही तुमचा ठसा उमटवू शकता या बाबत मेघना एरंडे यांनी सविस्तर माहिती दिली. 

कार्टून फिल्मसाठी जे आवाज दिले जातात ते कसे दिले जातात याचे प्रात्यक्षिक त्यांनी करुन दाखविल्यानंतर बच्चेकंपनी खूष झाली. आवाजावर नियंत्रण कसे ठेवायचे, एखादे वाक्य उच्चारताना त्याची फेक कशी असली पाहिजे, आवाजाचा स्तर कोणता असला पाहिजे, कोणाशी कोणत्या आवाजाच्या पातळीत संवाद साधायचा या सारख्या गोष्टींची त्यांनी सविस्तर माहिती दिली. घशावर ताण न येता कसा संवाद साधायचा, पाठांतर कसे करायचे या सारख्या गोष्टींच्या युक्ती त्यांनी मुलांना सांगितल्या. मुलांशी संवाद साधत मुलांना सहभागी करुन घेत मेघना एरंडे यांनी मुलांना या प्रसंगी बोलते केले. मुलांनीही प्रसंगी शंका निरसन करुन घेतले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सुनेत्रा पवार यांनी मेघना एरंडे यांचे आभार व्यक्त केले. 

Web Title: Marathi news baramati news voice over dubbing discussion