साखरेच्या भावातील घसरण थांबली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

भवानीनगर - देशातील साखरेचे भाव नियंत्रणात राहावेत, यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या उत्पादनाच्या ८६ टक्के साखर शिल्लक ठेवण्याच्या निर्णयामुळे साखर भावातील घसरण थांबली आहे. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत साखर भाव क्विंटलमागे २५० ते २९० रुपयांनी वाढले आहेत. 

भवानीनगर - देशातील साखरेचे भाव नियंत्रणात राहावेत, यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या उत्पादनाच्या ८६ टक्के साखर शिल्लक ठेवण्याच्या निर्णयामुळे साखर भावातील घसरण थांबली आहे. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत साखर भाव क्विंटलमागे २५० ते २९० रुपयांनी वाढले आहेत. 

‘इस्मा’ या खासगी कारखान्यांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाला भेट देऊन साखर उद्योगातील घसरण व तोट्याबाबतची वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. साखर कारखान्यांना महिन्यातच साखर विक्रीसाठी काढावी लागते, हेच भावातील घसरणीस कारणीभूत असल्याचे मत ‘इस्मा’चे अध्यक्ष गौरव गोयल, उपाध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केले. ही घसरण थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. त्यानंतर राष्ट्रीय साखर संघाचे शिष्टमंडळही सरकारला भेटले. त्याची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेतला व साखर कारखान्यांनी उत्पादित झालेल्या एकूण साखरेपैकी ८६ टक्के साखर शिल्लक राहील, अशा प्रकारे विक्रीचा निर्णय घ्यावा, असे जाहीर केले. त्या निर्णयामुळे लगेचच साखरेचा बाजार सावरला. एस- ३० साखरेचा प्रतिक्विंटल २८७० रुपयांपर्यंत घसरलेला भाव ३१६० रुपयांवर पोचला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेले लिलाव पाहता साखर येत्या काही दिवसांत प्रतिक्विंटल ३२००- ३३०० रुपयांचा टप्पा गाठेल, असे चित्र आहे. 

दुसरीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी यापूर्वीच साखर बाजारात आणली असल्याने आता अनेक कारखान्यांकडे केंद्राने ठरवून दिलेला ८६ टक्के एवढाही साठा उरलेला नाही. त्यामुळे साखरेचा आताचा भाव निश्‍चित वाढीव राहील, असे दिसते.

साखरेच्या भावात सातत्याने होणारी घसरण थांबण्यास केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निश्‍चितच मदत झाली आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा वाढलेला संचित तोटा भरून येण्यास काही प्रमाणात मदत होईल, तरीही भविष्यात हा भाव कसे राहतो, यावर परिस्थिती अवलंबून राहील.
- रोहित पवार, उपाध्यक्ष, इस्मा

या निर्णयामुळे साखरेचा भाव टिकून राहील. फेब्रुवारी व मार्चमध्ये सरकारने किती साखर विकायची हे आखून दिले आहे. त्या मर्यादेतच साखर बाजारात येईल. परिणामी, साखरेचा भाव आणखी वाढेल. यापूर्वी आर्थिक कारणावरून कितीही साखर विकण्याचा प्रकार जे कारखाने करीत होते, ते थांबेल.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर संघ

कारखान्यांना कोटा ठरवून दिल्याने विक्रीवर मर्यादा येणार आहेत. उत्पादनानुसार विक्रीचे प्रमाण निश्‍चित केले जाणार आहे. त्यामुळे आता साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होईल. साखर विक्रीचे धोरण निश्‍चित केल्याने देशातील साखरेचे भाव केंद्र सरकारच्या हाती आहेत. भाव वाढल्याने कारखानदारांनी व्यापाऱ्यांशी केलेले साखर विक्रीचे व्यवहार रद्द केले. आता जुन्या उत्पादित साखरेचे भाव कमी असतील. पण नव्याने उत्पादित साखरेचे भाव वाढलेले असतील.
- राजेश फुलफगर, व्यापारी 

Web Title: marathi news bhavaninagar news pune news sugar rate