जल्लोषपूर्ण वातावरणात ख्रिसमसची तयारी 

Christmas-Celebration
Christmas-Celebration

पुणे : चर्चमध्ये केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, पेस्ट्रीज, केकने सजलेल्या बेकऱ्या, ख्रिसमस ट्री-आकाशकंदिलाने सजलेले रस्ते अन्‌ सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे जल्लोषपूर्ण वातावरण शनिवारी ख्रिसमस तयारीच्या निमित्ताने शहरात पाहायला मिळाले. "जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे' असे म्हणत सोमवारी प्रभू येशूच्या जन्माचे स्वागत होणार असून, त्याच्या सेलिब्रेशनचा उत्साह कॅम्प, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, औंध, कोरेगाव पार्क, बाणेर आदी भागांत दिसत आहे. यात तरुणाईनेही ख्रिसमसची हटके तयारी केली असून, ख्रिसमसचे सेलिब्रेशन तरुणाई "लाल' रंगाच्या थीमनुसार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये करणार आहे. 

सोमवारी साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमसची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी मध्यरात्रीनंतर या सेलिब्रेशनला उधाण येणार आहे. येशुजन्माचा आनंद साजरा करण्यासाठी शहरातील चर्चमध्येही रंगरंगोटी करण्यात आली असून, विशेष प्रार्थना आणि पारंपरिक कार्यक्रमही आयोजिण्यात आले आहेत. मध्यरात्रीनंतर घराघरांमध्ये पारंपरिक प्रार्थना आणि फटाक्‍यांची आतषबाजी होणार आहे, तर सकाळी साडेआठनंतर शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना होणार आहेत. यानिमित्त विविध मंडळांमध्ये आणि चर्चमध्ये येशुजन्माचा देखावा तयार केला आहे. दोन दिवसांपूर्वीच केक आणि बिर्याणीची ऑर्डर दुकानदारांना देण्यात आली आहे. 

चौकाचौकांत सांताक्‍लॉजच्या लाल टोप्या विकणारे विक्रेते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. नाताळनिमित्त शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, आकर्षक पॅकिंगमध्ये ठेवलेली चॉकलेट आणि रंगीबेरंगी मेणबत्त्यांनी दुकाने सजली आहेत. कॅम्प परिसर तर विद्युत रोषणाई, आकाशकंदील, ख्रिसमस ट्रीच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे. मॉलमध्ये सांताक्‍लॉजचा वेष परिधान करून काही मंडळी लहान मुलांना भेटवस्तू आणि चॉकलेट देताना दिसत आहेत. कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

याबाबत सुरेखा ठोंबरे म्हणाल्या, ""ख्रिसमसची तयारी मी 21 तारखेपासून सुरू केली आहे. ख्रिसमस स्पेशल केक कुकीज या पदार्थांसोबत शंकरपाळी, चिवडा, करंजी हे फराळाचे पदार्थदेखील बनविले आहेत. दोन प्रकारचे मटण एकत्र करून ग्रेव्ही असणारी "सोर्पटेल' ही डिश बनविणार आहे. मध्यरात्री मी कुटुंबासमवेत "मास'साठी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून केक कापणार आहे. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीचा प्लॅन आहे.'' 

तरुणाईकडून खास प्लॅनिंग 

सांताक्‍लॉजची लाल रंगाची टोपी, ख्रिसमस-ट्रीने सजविलेले हॉटेल्स आणि "लाल' रंगाच्या थीमनुसार तरुणाईने ख्रिसमस पार्टीचे प्लॅनिंग केले आहे. ख्रिसमसच्या दिवशी सायंकाळनंतर तरुणाईची "पार्टी' वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रंगणार आहे. केक, बिर्याणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या पार्टीचे आकर्षण असेल, तर सांताक्‍लॉजचा वेष परिधान करून आलेली व्यक्ती या तरुणाईला भेटवस्तू देणार आहेच. 

ख्रिसमसला मिरवणूक 

ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा महत्त्वाचा भाग म्हणजे मिरवणूक. पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन प्रार्थना व मिरवणूक काढण्यात येते. लोक मिरवणुकीत गाणी म्हणत ठिकठिकाणी जातात आणि एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. या मिरवणुकीत सांताक्‍लॉजही सहभागी होऊन लहानग्यांना चॉकलेट आणि भेटवस्तू देतात. आपल्या "गुडी बॅग'मधून लहानग्यांना व तरुणांना ते भेटवस्तू देऊन ख्रिसमसचा आनंद व्यक्त करतात. 

तरुणांचा उत्साह 

पवित्र नाम देवालयाचे सहसचिव सुधीर चांदेकर म्हणाले, ""ख्रिसमस हे आनंदी पर्व आहे. येशुजन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात होते. त्याची तयारीही पूर्ण झाली असून, चर्चमध्ये पारंपरिक प्रार्थना होणार आहे. या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये तरुणाईचा सहभाग मोठा असतो. मोठ्या उत्साहाने तरुणाई यात सहभागी होते. अगदी सजावटीपासून ते सेलिब्रेशनच्या पार्टीपर्यंत तरुणांचा उत्साह दिसून येतो. या आनंदात सांताक्‍लॉजही सहभागी होतात आणि भेटवस्तू देतात.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com