सीआयआरटी घडवितेय कुशल वाहनचालक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पिंपरी - अवजड वाहनचालकांना वाढती मागणी आणि त्यांची उपलब्धता यातील अंतर कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) पुढाकार घेतला आहे. कुशल वाहनचालक घडविण्यासाठी संस्थेने प्रशिक्षण कार्यशाळेची (निवासी) आखणी केली आहे.

पिंपरी - अवजड वाहनचालकांना वाढती मागणी आणि त्यांची उपलब्धता यातील अंतर कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) पुढाकार घेतला आहे. कुशल वाहनचालक घडविण्यासाठी संस्थेने प्रशिक्षण कार्यशाळेची (निवासी) आखणी केली आहे.

रस्ते माल वाहतूक क्षेत्रातील अवजड वाहनचालक हा प्रमुख घटक. मात्र, अनेक किलोमीटरचा सातत्यपूर्ण प्रवास, आठ-दहा तासांहून अधिक काळ करावे लागणारे ड्रायव्हिंग, त्यातील धोके, कुटुंबांशी तुटणारी नाळ आणि तोकडा मोबदला अशा कारणांमुळे वाहनचालक अवजड वाहतुकीपासून दुरावत आहेत. परिणामी देशात अवजड वाहनचालकांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून विविध क्षेत्रांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे सीआयआरटीने कुशल वाहनचालक घडविण्याचे काम हाती घेतले आहे.

कुशल वाहनचालक घडविताना बेरोजगार, अल्पशिक्षित आणि ग्रामीण युवकांना रोजगार मिळावा, हीदेखील त्यामागील भूमिका आहे. विशेषत: अशा युवकांनाच प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले जात आहे. एका खासगी कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून विनामूल्य प्रशिक्षण दिले जात आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेणाऱ्यांना सर्वोत्तम नोकरी मिळवून देण्याची जबाबदारीही सीआयआरटीने घेतली आहे. आतापर्यंत दोन कार्यशाळांमधून ४५ कुशल चालक घडले आहेत. त्यांना रोजगारही मिळाला आहे. 

नाइट ड्राइव्ह मॉड्यूल
कार्यशाळेत संस्थेने नाइट ड्राइव्ह मॉड्यूल विकसित केले आहे. त्या अंतर्गत प्रशिक्षणार्थींना स्वतंत्रपणे रात्री केवळ वाहनाच्या हेडलाइटच्या साहाय्याने गाडी चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. 

सिम्युलेटर
थेट वाहन हातात देण्याऐवजी वाहनाच्या प्रतिकृतीद्वारे वाहन चालविण्याची प्राथमिक तयारी करून घेतली जाते. या प्रतिकृतीमध्ये प्रत्यक्ष रस्त्याचा हलता आराखडा तयार केला आहे. तसेच, डोंगर, ग्रामीण, शहरी, घाट, महामार्ग अशा विविध रस्त्यांसह पाऊस, धुके, रात्र अशा वातावरणीय बदलांचा प्रोग्रॅम बसविला आहे. या व्यतिरिक्तही रस्त्यावरील कमी, मध्यम आणि अधिक वाहतुकीचे फंक्‍शनिंग त्यात आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्‍वास वाढतो.

वस्तुस्थिती
 देशात आवश्‍यकतेपेक्षा ५० टक्के वाहनचालकांची संख्या कमी 
एसटीसाठी ५० हजार प्रशिक्षित वाहनचालकांची गरज आहे. मात्र, सीआयआरटीच्या कार्यशाळेत केवळ ३० ते ३५ चालकांचा सहभाग  
अपुऱ्या संख्येमुळे डबल ड्युटीचे प्रमाण मोठे, परिणामी चालकावर ताण येऊन अपघाताच्या घटनांत वाढ

कार्यशाळेची रचना
    वाहतूक नियमावलीची माहिती (थिअरी)
    सिम्युलेटरद्वारे वाहन चालविण्याबाबत पायाभूत माहिती
    वर्कशॉपच्या माध्यमातून गाडीची अंतर्गत रचना (अंडर चासिज)
    ट्रॅकवर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण
    प्रत्यक्ष रस्त्यावर प्रशिक्षण

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
    ४५ दिवसांचा कालावधी
    निवास व जेवणाची विनामूल्य सोय
    प्रशिक्षणार्थींची नेत्रतपासणी
    क्‍लिनिकल टेस्ट : जजमेंट, ॲटिट्यूड, रिॲक्‍शन, अँटिसिपेशन
    जंक्‍शन, ग्रेडियंट, हंप, डीप ट्रॅकवर सराव
    वाहन देखभालीचे प्रशिक्षण
    अचानक निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्याविषयी मार्गदर्शन
    मन एकाग्रतेसाठी योग व ध्यानधारणा

चालक टंचाई लक्षात घेऊन वाहन उत्पादन क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांनी चालक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आर्थिक, तांत्रिक साह्य देण्याची तयारी दर्शविली आहे. टाटा मोटर्स कंपनीतील काही अधिकारी प्रशिक्षक म्हणूनही सहभागी झाले आहेत. चालकांचा तुटवडा कमी करतानाच, कुशल चालक घडवून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करणे, हा त्या मागील मुख्य उद्देश आहे.
- प्रशांत काकडे, वाहतूक अभियंता, सीआयआरटी

Web Title: marathi news CIRT Driver pimpri news heavy vehicle