बेकायदा खासगी सावकारांवर 'मोक्का'अंतर्गत कारवाई : सुवेझ हक

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 17 जानेवारी 2018

''दौंड पोलिस ठाण्यात एक तक्रार देण्यासाठी एकाचवेळी शंभर ते दीडशे लोकांचा जमाव आणण्याचा प्रकार वाढला आहे. जमाव आणून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जमावामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आगामी काळात जमावाने येऊन तक्रार देण्याचा प्रकार पूर्णपणे बंद केला जाईल.''

- सुवेझ हक, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक

दौंड : ''दौंड शहर व परिसरात खासगी सावकारीप्रकरणी तक्रारदारांनी पुढे आले पाहिजे. माझ्याकडे किंवा अन्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास निश्चित कारवाई केली जाईल. बेकायदा खासगी सावकारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली जाईल'', अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.  

दौंड पोलिस ठाण्यात आज (ता. १७) पत्रकारांशी बोलताना सुवेझ हक यांनी ही माहिती दिली. दौंड शहरात 'इंडियन रिझर्व्ह बटालियन'मध्ये शस्त्रागार विभागात नेमणुकीस असलेला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय बळीराम शिंदेने जुगार आणि खासगी सावकारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात मंगळवारी तीन जणांचा मृत्यू झाला होता. 

संजय शिंदेने केलेल्या गोळीबाराच्या घटनाक्रमाविषयी माहिती देताना सुवेझ हक म्हणाले, ''संजय शिंदे (वय ३२) याच्या सांगण्यानुसार दौंड शहरातील अण्णा जाधव (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. गोवा गल्ली, दौंड) याच्याकडून २५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. परंतु तो ते कर्ज परत करू शकला नाही. पैसे परत न दिल्याने अण्णा जाधव याने तगादा लावल्याने तो त्रस्त होता. गोपाल शिंदे याच्याकडून संजय शिंदे याला दहा हजार रूपये येणे होते व त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. मंगळवारी दौंड येथील इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या शस्त्रागारातून संजय शिंदे याने २२ जिवंत काडतूसे व एक ९ एमएमचे पिस्तूल घेतले होते. दुपारी दीड वाजता नगर मोरी चौकात त्याने गोपाल शिंदे याच्याकडे पैसे परत मागितले होते. दोघांमध्ये या पैशांवरून जोरदार बाचाबाची झाली व संजय शिंदे याने त्याच्याकडील पिस्तूलातून गोपाल शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पाहून परशूराम पवार याने संजय शिंदे याला मारण्यासाठी विट उचलल्याने संजय शिंदे याने त्याच्यावर देखील गोळ्या झाडल्या. अगदी जवळून एकूण सात गोळ्या झाडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संजय शिंदे हा दुचाकीवरून अनिल विलास जाधव याच्या बंगल्यासमोर गेला व तेथे त्याने अनिल यास तीन गोळ्या झाडून ठार केले''. 

ते पुढे म्हणाले, ''सुपे येथे संजय शिंदे याला ताब्यात घेतले तेव्हा तो दारुच्या नशेत होता आणि आत्महत्या करण्याच्या विचारात होता. संजय शिंदे याच्याकडून एक ९ एमएम पिस्तूल, बारा काडतुसे आणि काडतुसांचे दोन मॅगझिन पोलिसांनी हस्तगत केले आहे''. 

Web Title: marathi news daund news will take action against illegal things says SP of pune rural