पंक्‍चर  काढण्यासाठी  सरपंच सरसावते तेव्हा... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

महिलांनी आज स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रांत सिद्ध करून दाखवले आहे. मीदेखील पंक्‍चर काढण्याचा व्यवसाय करते, यात काही आश्‍चर्य करण्यासारखे नाही. मी गेल्या तीन वर्षापासून गावची सरपंच आहे. गावकऱ्यांशी संवाद साधण्यापासून ते त्यांच्या समस्या सोडविण्यापर्यंत कामे मला करावी लागतात. तसेच कुटुंबाची जबाबदारीही सांभाळावी लागते. महिलांनी स्वतःला सक्षम बनवून आवडीच्या क्षेत्रात काम करावे.
-लता भिसे 

गावातल्या दहा किलोमीटर आसपास कोणतेही पंक्‍चर काढण्याचे दुकान नव्हते... म्हणून लता भिसे यांनी भिवरी गावात (ता. पुरंदर) पंक्‍चरचे दुकान सुरू केले... एका महिला पंक्‍चर काढतेय हे पाहून गावकऱ्यांना नवल वाटायचे. त्यात लता या गावच्या सरपंच असल्याने ही गोष्टीच जणू प्रत्येकासाठी आश्‍चर्याची होती. 

आत्मविश्‍वासाच्या जोरावर अवघ्या तिसरीपर्यंत शिकलेल्या लता यांनी गावकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला आणि विश्‍वासही जिंकला. एक सरपंच म्हणून त्या आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकाळ’ने ४६ वर्षीय लता यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची ही अनोखी कहाणी जाणून घेतली. त्या २०१५मध्ये बिनविरोध गावच्या सरपंच झाल्या. त्यापूर्वी त्या पतीचा पंक्‍चरचा व्यवसाय सांभाळत होत्या आणि सरपंच झाल्यानंतरही सांभाळत आहेत. अगदी सायकल असो वा दुचाकी मोठ्या सफाईने त्या पंक्‍चर काढतात. 

कुटुंबाची जबाबदारी, गावच्या सरपंचपदाची भूमिका आणि व्यवसाय सांभाळणाऱ्या एक व्यावसायिक या तिहेरी भूमिकेत त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. दहा वर्षांपासून त्या पंक्‍चर काढण्याचा व्यवसाय करत आहेत. गावात पंक्‍चरचे दुकान नसल्याने त्यांच्या पतीने दहा वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यानंतर त्यांनी मंडप टाकण्याचा व्यवसाय सुरू केल्यामुळे पंक्‍चरच्या व्यवसायाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. यामुळे मोठ्या कौशल्यतेने लता यांनी हा व्यवसाय सांभाळला आणि सर्व कामकाज शिकून घेतले. आजही ग्रामपंचायतीच्या बैठका आणि सरपंचपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर सायंकाळी त्या पंक्‍चर काढतात. एक सरपंच म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून त्या आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. गावकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांचा अभिमान वाटतो. 

भिसे यांचा मुलगा नवनाथ म्हणाला, ‘‘आई जेव्हा पंक्‍चर काढते. तेव्हा अनेक जण पाहतात. पण नंतर त्यांना आईच्या कामाचे कौतुक वाटते. आई सरपंच आणि व्यवसाय दोन्ही भूमिका जबाबदारीने सांभाळत आहे. तिला आमचा नेहमीच पाठिंबा असतो. अधिक शिकलेली नसूनही तिने जिद्दीच्या जोरावर स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे.’’

Web Title: marathi news International Womens Day lata bhise pune