बिबट्यांसाठी ऊसतोडणी हंगाम संवेदनशील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

बिबट्यांची संख्या तसेच वनक्षेत्राचे पारंपरिक वास्तव्य सोडून बिबट्याचा माणसाच्या वस्तीतील वावर वाढल्यामुळे वन्यप्राणी व्यवस्थापनाचे सशक्त आव्हान समोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी, तसेच बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. याविषयी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांच्याशी मीनाक्षी गुरव यांनी साधलेला संवाद.

बिबट्या आणि माणूस यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याचा संवेदनशील 
कालावधी कोणता?

- नोव्हेंबरपासून ऊस तोडणीचा हंगाम सुरू होतो. माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्‍यता याच कालावधीत सर्वाधिक असते. उसाचे शेत हे बिबट्याला (मादी) संरक्षित अधिवास वाटत असते. त्यामुळे विणीच्या हंगामात बिबट्या (मादी) याच शेतात आसरा घेतात. ऊस तोडणीच्या हंगामात कामगार शेतात जाऊन तोडणीचे काम करत असतात. अशावेळी पिल्लांच्या संरक्षणासाठी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्या (मादी) स्वत:च्या आणि पिल्लांच्या संरक्षणासाठी प्रतिहल्ला करण्याची दाट शक्‍यता असते. याच काळात आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलात अन्नाचा तुटवडा जाणवू लागतो. परिणामी बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी गावाच्या जवळ येतात. म्हणूनच या कालावधीकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे.

बिबट्या पिंजऱ्यात पकडला जावा, याकरिता कोणत्या क्‍लृप्त्या वापरल्या जातात?
- बिबट्याचा वावर असल्याची माहिती गावकऱ्यांनी सांगितल्यास वन अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शहानिशा करतात. बिबट्याच्या पावलाचे ठसे, त्याने केलेली शिकार, त्याचे प्रमाण, पशुधनावर हल्ला झालाय की नाही, याची माहिती घेतली जाते. त्यानंतर गावाच्या आसपास पिंजरा लावण्यासाठी पावले उचलली जातात. पिंजरा लावण्यापूर्वी परिसरातील घटनांच्या नोंदी घेतल्या जातात. बिबट्याने कोठे कुत्र्यांवर हल्ला केला, गावकऱ्यांना तो कोठे दिसला, शेळ्या किंवा बकरी अशा पशुधनावर कोठे हल्ला केला, त्या जागांची पाहणी करून त्याचे मॅपिंग केले जाते. त्याचे ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने जीपीएस मॅपिंग करायचे. त्यातून वन्यप्राण्यांच्या वावराचा नकाशा तयार केला जातो. या नकाशाच्या आधारे प्रत्यक्ष परिसरात शेत कशा प्रकारचे आहे ते पाहिले जाते. त्यावरून पिंजरा कोठे लावायचा हे ठरविले जाते. वन्यप्राण्यांच्या सहज लक्षात येणार नाही, अशी जागा पिंजरा लावण्यासाठी निवडली जाते. परंतु, पिंजरा लावल्यानंतर गावकऱ्यांनीदेखील काहीसा संयम दाखवायला हवा.

बिबट्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल काय सांगाल?
- बिबट्या हा अत्यंत चतुर प्राणी आहे. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कसब बिबट्याकडे आहे. घनदाट जंगलापासून ते ओसाड जागा, उसाचे शेत, शहराजवळील टेकड्या अशा कोणत्याही भागात तो मुक्तसंचार करू शकतो. गेल्या कित्येक वर्षांपासून तो माणसाच्या जवळच राहत आहे. फक्त बिबट्याशी निगडित एखादी घटना घडली तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव माणसाला होते. अनेक वेळा बिबट्याला पकडण्यासाठी ‘स्टॅटेजिक प्लॅनिंग’ केले जाते. परंतु काहीवेळा तो हे नियोजन उधळवून टाकतो. जंगलात अन्नाचा तुटवडा जाणवू लागला, की बिबट्या जंगलाच्या बाहेरील परिसरातही सहज वावरू शकतो.  माणसाच्या वस्तीजवळ सहज भक्ष्य मिळत असल्यामुळे तो 
गावाच्या, वस्तीच्या आजूबाजूला राहण्याचा पर्याय निवडतो.

Web Title: marathi news leopard Dr. ajay deshmukh interview