चिमुकल्या शिलेदारांची भैरवगडावर स्वारी

गणेश बोरुडे
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

तळेगाव स्टेशन : गिर्यारोहणाची वाढती क्रेझ आता बच्चेमंडळींनाही भुरळ घालू लागली असून, तरुण गिर्यारोहकांना तोडीस तोड देत तळेगाव दाभाडे येथील अमोघ वर्तले आणि ईशा चांदगुडे या दहा वर्षांच्या चिमुरड्यांनी ठाणे जिल्ह्यातील मोरोशीजवळच्या अत्यंत कठीण अशा भैरवगडावर यशस्वी चढाई करुन दाखवली आहे. 

तळेगाव स्टेशन : गिर्यारोहणाची वाढती क्रेझ आता बच्चेमंडळींनाही भुरळ घालू लागली असून, तरुण गिर्यारोहकांना तोडीस तोड देत तळेगाव दाभाडे येथील अमोघ वर्तले आणि ईशा चांदगुडे या दहा वर्षांच्या चिमुरड्यांनी ठाणे जिल्ह्यातील मोरोशीजवळच्या अत्यंत कठीण अशा भैरवगडावर यशस्वी चढाई करुन दाखवली आहे. 

ठाणे, पुणे, नगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या जवळच असणाऱ्या मोरोशी गावाजवळ भैरवगड अभेद्यपणे उभा आहे. पश्चिम घाटाच्या सह्यकड्यांवर बांधल्या गेलेल्या किल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी सुळका 'डाईक' तसेच माथा "व्होल्कॅनिक प्लग" रचनेतील भौगोलिक अविष्कार पाहावयास मिळतात. याच 'डाईक'  रचनेचा अप्रतिम नमुना म्हणजे "भैरवगड". चढाईस अत्यंत कठीण असलेला आणि ४०० फूट उंचीचा सरळसोट कातळ नैसर्गिकरित्या लाभलेला भैरवगड किल्ला समुद्रसपाटीपासून ८६४ मीटर उंचीवर बांधण्यात आला. त्यामुळेच यावरील चढाई दुर्गप्रेमींना नेहमीच आव्हानात्मक ठरते. अंतिम टप्प्यापर्यंत जाण्यासाठी गिर्यारोहकास 'प्रस्तरारोहण' तंत्र अवगत असणे अत्यंत गरजेचे ठरते.

मात्र, तळेगाव दाभाडे येथील अमोघ वर्तले आणि ईशा चांदगुडे या अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्या शिलेदारांनी सारी आव्हाने पेलून अत्यंत जिकिरीची चढाई करत भैरवगडाच्या माथ्यावर आपले पाऊल ठेवले.

"राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा। नाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याही देशा" गीतातील दोन्ही कडव्यांतील समर्पकता,नाजूक बालकांनी कणखर भैरवगड सर करुन सिद्ध केली. अमोघ हा तळेगावातील माउंट सेंट ऍन तर ईशा ही बालविकास विद्यालयात शिकत आहे.

ताणतणावाच्या आणि अतिअभ्यासाच्या वेळापत्रकामुळे सहसा लहान मुले निसर्ग आणि भटकंतीकडे वळताना दिसत नाहीत. परंपरेनेच गिर्यारोहणाचे बाळकडू मिळालेल्या या दोघांनी मात्र भैरवगडाची चढाई जिद्दीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण करत लहान मुलांना निसर्गाकडे जाण्याचा आदर्श आणि संदेश आपल्या प्रत्यक्ष धाडसी कामगिरीतून दिला आहे.

या मोहिमेदरम्यान गिर्यारोहक भगवान चावले, लहू उघडे तसेच चिमुरड्यांचे पालक ओंकार वर्तले आणि योगेश चांदगुडे हे त्यांच्यासोबत होते. इतक्या कमी वयात कठीण चढाईने अनेकांना या चिमुरड्यांनी थक्क केले. दोघानांही लहानपानपासूनच दुर्गभ्रमंतीची आवड असून, युवामंडळींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक गड-किल्ले मोहिमांमध्ये नोंदविलेला यशस्वी सहभाग निश्चितच विशेष असा आहे.
 

Web Title: marathi news local news child tracking bhairavgad