'ऍरेन्ज'पेक्षा ओळख, मैत्रीतून हवा जोडीदार ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

आधी आपल्या भावी जोडीदाराशी ओळख करून घेणे आणि मगच विवाह करणे, हा कल आजच्या तरुणाईत नक्कीच वाढत चालला आहे. अर्थात, हा सरसकट प्रेमविवाहांचा ट्रेंड म्हणता येण्याऐवजी; पूर्वीच्या पारंपरिक ऍरेन्ज्ड मॅरेज या संकल्पनेचे हे बदलते रूप आहे असे म्हणता येईल. विशेष म्हणजे आता पालकांचाही याला पाठिंबा दिसून येतोय. सध्या विवाहसंस्था संक्रमणाच्या काळातून जात आहेत, हेही यातून दिसते. 
- स्मिता जोशी (समुपदेशक)

पुणे : 'आमच्या आईबाबांच्या वेळी असतील काही रिवाज; पण आम्हाला आता त्यात बदल हवेत... मुलगा-मुलगी 'दाखवणे' आणि 'पाहायला जाणे' या कांदेपोह्यांच्या पलीकडे नवं काहीतरी हवंय... ऍरेन्ज्ड मॅरेज ही संकल्पना कालबाह्य वाटतेय...आम्ही स्वतःचा जोडीदार स्वतः शोधू, मैत्री करू आणि मनं जुळली की लग्नही...' या भावना आहेत डिजिटल युगामुळे नवा विचार करणाऱ्या तरुणाईच्या. 

तरुणाईचे नातेसंबंधांबाबतचे समाजभान बदलत असल्याचे हे निरीक्षण 'यू गव्ह' आणि 'हॅपन' या संस्थांनी केलेल्या एका ऑनलाइन पाहणीतून पुढे आले आहे. देशभरातील विविध शहरांसह पुण्यातही पाहणी झाली. अठरा वर्षांवरील सुमारे 1 हजार जणांशी संपर्क साधून एका ऑनलाइन प्रश्‍नावलीच्या मदतीने झालेल्या या पाहणीत मैत्री, लग्नसंस्था, डेटिंग, नव्याने ओळख करण्याच्या पद्धती अशा विविध विषयांवर अनेकांनी आपली मतं मनमोकळेपणाने मांडली आहेत. 

पूर्वापार चालत आलेल्या अनेक समजुती आणि चालिरीतींनाही या 'सोशल एरा'मध्ये विविध स्थित्यंतरांना सामोरे जावे लागत असल्याचे या पाहणीतून दिसत आहे. दिवसागणिक वाढत असलेल्या मॅट्रिमोनियल आणि अलीकडेच त्यात भर पडलेल्या ऑनलाइन डेटिंग वेबसाइट्‌स आणि ऍप्समुळे हे आता अधिक ठसठशीतपणे पुढे यायला सुरवात झाली आहे. मोठ्या शहरांसह आता मध्यम आकारांच्या शहरांतही हा ट्रेंड नव्याने रुजू होत आहे. 

पाहणीतील निरीक्षणे : 

  • अनेकजणांची अधिकाधिक 'सोशल' होण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मलाच अधिक पसंती 
  • नवे मित्र, नव्या ओळखी करताना तब्बल 54 टक्के भारतीय घेतात इंटरनेटवरील संकेतस्थळे, ऍप्स आणि सोशल मीडियाची मदत. 30 ते 39 या वयोगटात हे प्रमाण अधिक 
  • 55 टक्के जणांना डेटिंग ऍप, संकेतस्थळे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नवे मित्र-मैत्रीणी आणि जोडीदार शोधायचाय. 18 ते 29 वयोगटात हे प्रमाण 61 टक्के 
  • ऍरेन्ज्ड मॅरेज आता कालबाह्य होत असून, आपल्या आवडीच्या जोडीदारासोबतच आयुष्य घालवता आले पाहिजे, असे सुमारे 52 टक्के लोकांना वाटते 
  • नात्यांचा त्रासच खूप असेल, तर अधिक गुंत्यांऐवजी नातीच नकोत, एकटेच राहणे चांगले; असेही तब्बल 60 टक्के जणांनी नोंदवले आहे 
Web Title: marathi news marathi website Friendship Day Love Marriage Arranged Marriage