शाळा भरते जुन्या इमारतीत; नव्या इमारतीला तडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

भीमाशंकर : जून महिन्यात झालेल्या पावसामुळे नवीन माळीण (ता. आंबेगाव) येथील घरे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळे शाळा नवीन इमारतीऐवजी जुन्या ठिकाणच्या तीन खोल्यांत भरत आहे. शाळेची नवीन इमारत प्रशस्त असूनही मुलांना मात्र जुन्या इमारतीत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. 

माळीण येथे लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषद शाळा आणि त्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, त्या सध्या बंद आहेत. नुकतेच झालेल्या पहिल्या पावसात नवीन माळीणची दयनीय अवस्था झाल्याने जिल्हा परिषद शाळा जुन्या इमारतीत भरत आहे. अंगणवाडी इमारत मोठ्या प्रमाणात गळत असल्याने अंगणवाडीही सेविकेच्या घरी भरते, यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. 

जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून 62 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत माळीण गावठाणाबरोबरच लेंभेवाडी, पोटेवाडी, झांजरेवाडी, चिंचेचीवाडी, पसारवाडी, गाडेकरवाडी व आमडे येथील मुले शिक्षणासाठी येतात. दूरच्या वाडीवस्तीवरून येणारी ही मुले जुन्या इमारतीतील तीन वर्गखोल्यांत दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत. 

दरम्यान, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीस तडे, तर अंगणवाडी इमारतीला गळती लागली आहे. त्यातच अंगणवाडी इमारतीजवळील भिंतीला तडे गेल्याने येथे येणारी मुले भयभीत झाली होती. ही भिंत प्रशासनाने तातडीने काढून टाकली; परंतु शाळेसमोर मोठ्या प्रमाणात गाळाचा राडारोडा झाला आहे. प्रशासनाने तातडीने शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: marathi news marathi website Malin Bhimashankar Education