वेल्हे तालुक्‍याच्या महसूलची उत्कृष्ट कामगिरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

वेल्हे : जिल्ह्यातील महसूल प्रशासन गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी मंगळवारी (ता. 1) महसूल दिनानिमित्त अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अल्पबचत भवन, पुणे येथील सभागृहात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. 

वेल्हे : जिल्ह्यातील महसूल प्रशासन गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी मंगळवारी (ता. 1) महसूल दिनानिमित्त अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अल्पबचत भवन, पुणे येथील सभागृहात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. 

पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी व जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, कुळकायदा शाखेचे रजा राखीव उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, भोरच्या उपविभागीय अधिकारी नयना बोंदार्डे, महसूलचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी उपस्थित होते. 

महसूल विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी संवर्गातील प्रदान करण्यात आलेल्या एकूण 15 पुरस्कारांपैकी अतिदुर्गम वेल्हे तालुक्‍यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या तिघांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

वेल्हे तालुक्‍यातील पुरस्काराने सन्मानित केलेल्या पुरस्कारार्थींमध्ये तहसीलदार प्रदीप उबाळे, लिपिक अंकुश गुरव व कोतवाल एस. डी. भुरूक यांचा समावेश आहे. तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेल्हे तालुक्‍यातील सातबारा संगणकीकरणाचे काम 98.83 टक्के पूर्ण असून, वेल्ह्याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. 

अतिदुर्गम भागात केलेल्या कार्याची दखल घेत 'उत्कृष्ट तहसीलदार' पुरस्काराने सन्मानित केले आहे. तहसीलदार उबाळे यांच्या रूपाने पहिल्यांदाच वेल्हे तालुक्‍याला हा मान मिळाला आहे. त्याचबरोबर वेल्हे तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत अंकुश गुरव यांनी नैसर्गिक आपत्ती, गुंजवणी, पानशेत व वरसगाव धरणाचे पुनर्वसन व भूसंपादन याविषयी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'उत्कृष्ट लिपिक' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 

तसेच पासली सजाअंतर्गत कार्यरत असणारे कोतवाल एस. डी. भुरूक यांनी निवडणूकविषयक केलेल्या कामाची दाखल घेऊन 'उत्कृष्ट कोतवाल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: marathi news marathi website Pune District Velhe