जिल्हा बॅंकेचे कर्जदार कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती

चिंतामणी क्षीरसागर
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातून 2,64,654 शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित दिवसांमध्ये राहिलेले अर्ज भरले जातील. 'आधार'च्या सर्व्हरची समस्या केंद्र पातळीवरची आहे. 'आधी अर्ज भरून नंतर ठसे घेण्याची प्रक्रिया करता येईल का' अशी विचारणा माहिती तंत्रज्ञान संचनालय विभागाकडे केली आहे; मात्र यावर अद्याप काहीही उत्तर आलेले नाही. जिल्हा बॅंक कर्जदारांची समस्या वरिष्ठ पातळीवर मांडली आहे. 
- आनंद कटके, पुणे जिल्हा उपनिबंधक 

वडगाव निंबाळकर : शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली, तरीही ऑनलाईन प्रक्रियेतील अडथळे दूर होऊ शकलेले नाहीत. जिल्हा बॅंकेने दिलेल्या कर्जांसाठीचे अर्ज भरताना हा पर्याय येत नसल्याने असे अर्ज अद्याप पूर्ण भरून झालेले नाहीत. शिवाय, मयत व्यक्तींचा अर्ज भरण्याबाबत कोणत्याही सूचना केंद्रांना दिल्या नसल्याने आजही याबाबतचा संभ्रम कायम आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून 'आधार'चा सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया थंडावली आहे. 'येत्या दहा-बारा दिवसांत आपले अर्ज भरून झाले नाहीत तर काय..' या भीतीमुळे शेतकरी ऐन गणेशोत्सवाच्या काळात महा ई सेवा केंद्रांवर ताटकळत उभे राहत सर्व्हर चालू होण्याची वाट पाहत बसल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे. 

अर्ज भरण्याची अंतिम मुदत जशी जवळ येत आहे, तशी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आपले अर्ज भरले जावे, यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. पण ऑनलाईन अर्ज भरताना येत असलेले अडथळे काही कमी होताना दिसत नाहीत. जिल्हा बॅंकेमार्फत सोसायटीच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरले जात आहेत; पण थेट जिल्हा बॅंकेने कर्ज दिले असेल, तर असे अर्ज भरताना 'बॅंक' हा पर्याय येत नाही. विशेषत: पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील कर्जदार शेतकऱ्यांना ही अडचण जाणवू लागली आहे. 'पुणे जिल्ह्यात असे एकूण सहा हजार खातेदार आहेत. त्यांचे अर्ज अद्याप भरले जात नाही' अशी माहिती जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भोसले यांनी 'सकाळ'ला दिली. 

येत्या काही दिवसांत यावर तोडगा निघाला नाही, तर पुणे जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याचा धोका आहे. 'अखेरच्या टप्प्यात का होईना; पण आमचा अर्ज भरला जाईल' या आशेने शेतकरी रोज या केंद्रांवर जाऊन पुन्हा प्रयत्न करत आहेत. 

मृत व्यक्तींच्या वारसांपैकी अर्ज कुणी भरायचा, याबाबत केंद्रांना काहीही सूचना नाहीत. त्यामुळे असे सुमारे हजार शेतकरी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

अर्ज भरला, तरीही गेल्या आठ दिवसांपासून 'आधार'चा सर्व्हर बंद आहे. चालू झाला, तरीही चार-पाच अर्ज भरले, की पुन्हा तो बंद होत आहे. शेतकरी आणि ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या व्यक्तींमध्ये भांडणारे प्रकारही होत आहेत. 

Web Title: marathi news marathi websites Farmers Loan waiver Maharashtra