पुण्याच्या शाश्वत विकासासाठी अभ्यासक-तज्ज्ञ आले एकत्र

पुण्याच्या शाश्वत विकासासाठी अभ्यासक-तज्ज्ञ आले एकत्र

पुणे : पुणे महानगराच्या शाश्वत विकासासाठी तरूण अभ्यासक आणि ज्येष्ठ तज्ञ दीर्घकालीन उद्देश ठेवून एकत्र आल्याचे चित्र आज (शनिवार) प्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पाहायला मिळाले.

निमित्त होते सरकारी पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाला (पीएमआरडीए) स्वयंस्फूर्तीने सुचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेल्या सिटिझन्स पीएमआरडीए या अभ्यास गटाच्या 'व्हीजन 2060' या पहिल्या व्यापक चर्चासत्राचे. दोन दिवस चालणाऱया या चर्चासत्राचा उद्या (रविवार) समारोप आहे.

आजच्या सादरीकरणांत महानगरासमोरील प्रश्नांचा आढावा घेतला गेलाच; शिवाय शाश्वत विकासासाठी पीएमआरडीएने नेमके काय करायला हवे, याबद्दल अभ्यासक आणि तज्ज्ञांनी सूचनाही केल्या.

'पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगराचा आज झपाट्याने विकास होत असला तरी त्याचा परिपूर्ण विकास होण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्‍यकता आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पाया भक्कम करण्यासह पायाभूत सुविधेच्या सक्षमीकरणावरही भर द्यायला हवा. पुण्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक आराखडा तयार करण्याची गरज आहे. भविष्यकालीन विकासाचा विचार करून ठोस उपाययोजना झाल्या तरच पुण्याचा विकास होऊ शकेल,'' अशी सूचना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी शनिवारी दिली. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अंमलबजावणीत प्राधान्याने लोकसहभाग गरजेचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स ऍण्ड इकॉनॉमिक्‍सचे संचालक डॉ. राजस परचुरे, अभ्यास गटाचे विनय हर्डीकर या वेळी उपस्थित होते. वास्तुविशारद हेमंत साठ्ये, 'सकाळ' चे विशेष प्रतिनिधी मंगेश कोळपकर, अर्थशास्त्राच्या अभ्यासक ऋतुजा चाफेकर, प्रा. समीर शास्त्री आणि मुक्ता कुलकर्णी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. 

विकास आराखड्याविषयी बोलताना साठ्ये म्हणाले,''शहराच्या विकास आराखड्यात प्रत्येकवेळी काही ना काही बदल होतो आणि त्यावर चर्चाही होते. पण, त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्याशिवाय आराखड्याचे काम पाहणाऱ्या संस्था आणि महापालिकेच्या कामकामात सुसूत्रता आणणे आवश्‍यक आहे. आराखड्यातील बांधकामाच्या कार्यपद्धतीचा विचार व्हायला हवा. आराखड्याच्या अंमलबजावणीत लोकसहभाग महत्त्वाचा आहे.'' 

पीएमपीएमएल पुण्याची लाइफलाइन होऊ शकते याविषयावर बोलताना कोळपकर म्हणाले,''पुण्याचा भौगोलिक विस्तार आणि वाढती लोकसंख्येचा विचार केला तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपी सक्षम करणे गरजेचे आहे. सध्या बसच्या दुरावस्थेपासून ते सुट्या भागातील खरेदीतील अनिश्‍चिततेपर्यंतच्या समस्या पीएमपी समोर असून, त्यात वेळीच बदल झाले पाहिजेत. बस डेपोंची संख्या वाढविण्यासह बीआरटी मार्गाचा विस्तार करणे, पीएमपीला तंत्रज्ञानाची जोड देणे आणि प्रवाशांमध्ये पीएमपीविषयी विश्‍वासार्हता निर्माण करायला हवे. पीएमपी सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलले जावेत.'' 

चाफेकर यांनी मेट्रोकडे पाहताना आपला दृष्टिकोन बदलावा आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांकडे सकारात्मकतेने पाहावे, असे मत व्यक्त केले. तर शास्त्री यांनी पाण्याच्या व्यवस्थापनावर सादरीकरण केले. मुक्ता कुलकर्णी यांनी वस्तींचा विकास आणि घर हे सर्वांसाठी याविषयावर आपले विचार मांडले. 
नितांत माटे यांनी प्रास्ताविक केले. 

''पीएमआरडीच्या संदर्भात आम्ही पुण्याच्या लोकसंख्येचा अभ्यास करत आहोत. पण, त्यात सतत काही ना काही बदल होत राहतात. म्हणूनच त्यासंदर्भात विशेष काळजी घ्यावी लागते. मुंबईच्या तुलनेत पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्याचा बारकाईने विचार केला जावा. परदेशातील प्रत्येक विकास आराखड्यात नागरिकांचे मत महत्त्वपूर्ण ठरते. पण, आपल्या देशात तसे होताना दिस नाही. म्हणूनच आपले शहर कसे असावे हे स्वप्न पाहताना एक नागरिक म्हणून आपण त्याच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. आपली मते नोंदवून विकासाची दिशा ठरवावी.'' 
- डॉ. राजस परचुरे, संचालक, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स ऍण्ड इकॉनॉमिक्‍स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com