ईटनची 'आयटीच'सोबत शिक्षणासाठी मदतीची घोषणा 

ईटनची 'आयटीच'सोबत शिक्षणासाठी मदतीची घोषणा 

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गटातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पॉवर मॅनेजमेंट कंपनी 'ईटन'ने 'आयटीच' स्कूल्ससोबत सहकार्य करार केला आहे. मुंढवा येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ईटनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग आरनॉल्ड यांनी ही घोषणा केली. 

आयटीच ईटनकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून पुढील तीन वर्षे शिक्षक आणि सहायक कर्मचाऱ्यांचे वेतन, विद्यार्थी आणि कर्मचारी विकास उपक्रम, प्रशासन आणि चालू खर्च यासाठी तसेच काही प्रमाणात पायाभूत सोयी व भांडवली खर्च यासाठी केला जाईल. या सहकार्याचा एक भाग म्हणून ईटनचे कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावण्यासाठी व्यावसायिक संस्थाभेटी, सहशालेय उपक्रम आणि व्यवसाय मार्गदर्शन या उपक्रमांद्वारे सक्रिय सहभाग घेणार आहेत. 

या वेळी आरनॉल्ड म्हणाले, ''आपण राहत आणि काम करत असलेल्या समाजासाठी ईटन नेहमीच कटिबद्ध आहे. आपला समाज सक्षम बनवणे आणि जीवनाची गुणवत्ता सुधारणे, या ध्येयावर आमचा भर आहे. आयटीच ही स्थानिक सरकारी शाळांमधील आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना सेवा देणारी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर काम करणारी संघटना आहे. त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर आमचा भर राहील.'' 

आयटीचचे संस्थापक व संचालक सौम्य जैन म्हणाले, ''आयटीच सध्या पुण्यातील पाच शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांना सेवा पुरवते. आम्ही विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून मोफत आणि दर्जेदार शिक्षण देतो. राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील आमच्या उपक्रमांसाठी, आम्ही केलेल्या मदतीचे कौतुक झाले आहे.'' 

आयटीच बरोबर सहकार्याबाबत बोलताना ईटनचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक नितीन चाळके म्हणाले, ''ईटन समाजाला सशक्त बनविण्यासाठी आणि सकारात्मक योगदान देण्यासाठी उत्कटतेने प्रयत्न करीत आहे. मला विश्वास आहे, की आयटीचला असलेला आमचा पाठिंबा आवश्‍यक ज्ञान आणि कौशल्यासह विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. त्याद्वारे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, तसेच ते रोजगारक्षम बनतील आणि सामाजिक प्रगतीसाठी योगदान देतील.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com