महिलांसाठी खास ऍप; सॅनिटरी नॅपकिनबाबत थेट यंत्रणेपर्यंत पोचविणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे : घरोघरी जमा होणाऱ्या 'सॅनिटरी नॅपकिन'ची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याकरिता महापालिकेने आता नवे पाऊल उचलले असून, घरातील नॅपकिनची माहिती महिलांना संबंधित यंत्रणेपर्यंत पोचविणे सहज शक्‍य व्हावे, यासाठी खास 'ऍप' विकसित करण्यात येणार आहे. ही यंत्रणा महिनाभरात सुरू करून तिची परिणामकारकता वाढविण्यासाठी महिलावर्गासह महापालिका आणि ठेकेदाराकडील यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे नियोजन आहे.

पुणे : घरोघरी जमा होणाऱ्या 'सॅनिटरी नॅपकिन'ची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याकरिता महापालिकेने आता नवे पाऊल उचलले असून, घरातील नॅपकिनची माहिती महिलांना संबंधित यंत्रणेपर्यंत पोचविणे सहज शक्‍य व्हावे, यासाठी खास 'ऍप' विकसित करण्यात येणार आहे. ही यंत्रणा महिनाभरात सुरू करून तिची परिणामकारकता वाढविण्यासाठी महिलावर्गासह महापालिका आणि ठेकेदाराकडील यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे नियोजन आहे.

परिणामी, महिलांना चांगली सेवा पुरवितानाच 'सॅनिटरी नॅपकिन'च्या नावाखाली होणारी पैशांची लूट थांबण्याची आशा आहे. हे नॅपकिन गोळा केल्याचे दाखवून ठेकेदार लाखो रुपये खिशात घालत असल्याकडे 'सकाळ'ने लक्ष वेधले होते. 

शहरातील 41 प्रभागांमध्ये 'सॅनिटरी नॅपकिन' गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या 'पुणे कनेक्‍ट' या सेवेअंतर्गत महिलांसाठी 'ऍप'ची सुविधा पुरविण्याची सूचना महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी केली होती. त्यावर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तातडीने कार्यवाही करून ही सुविधा उभारण्याबाबत संबंधित खात्याशी चर्चा केली. 

शहरात रोज साधारणतः 20 टन इतका 'सॅनिटरी नॅपकिन' कचरा जमा होतो; परंतु कामगार तो उचलत नसल्याने या कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने घरोघरी, शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये जाऊन हे नॅपकिन जमा करण्याची योजना सुरू केली आहे. त्याकरिता मोठी आर्थिक तरतूद करून ठेकेदार नेमले आहेत. त्यानुसार काही भागांतील सोसायट्या, शाळा, महाविद्यालयांमधील नॅपकिन गोळा करण्यासाठी 'डस्टबीन' ठेवले आहेत; मात्र घरोघरी जाऊन नॅपकिन गोळा केले जात नसल्याचे उघडकीस आले आहे. तरीही ते गोळा करून त्यावर प्रक्रिया होत असल्याचे सांगून ठेकेदार लाखो रुपये लाटत असल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. ही कामे करण्याकरिता महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने अशा योजनांमुळे ठेकेदारांचेच भले होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली. 

या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या सोयीकरिता आणि ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी 'पुणे कनेक्‍ट' या वेबपोर्टलशी संलग्न व्यवस्था केली जाणार आहे. ज्यामुळे सॅनिटरी नॅपकिनबाबत महिलांनी माहिती पुरविल्यास महापालिका ती संबंधित संस्थेपर्यंत पोचवेल. त्यानंतर घरोघरी जाऊन नॅपकिन जमा केले जातील, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

शहरात सर्वत्र सॅनिटरी नॅपकिन गोळा करण्याची यंत्रणा उभारण्याची गरज असून, ती अधिक परिणामकारक हवी. त्यासाठी पहिल्यांदा ऍप निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. ज्यामुळे महिलांना रोजच्या रोज सॅनिटरी नॅपकिन उचलण्याबाबत महापालिकेला कळविता येईल. या सुविधेमुळे महापालिकेची योजनाही प्रभावीपणे अमलात येण्यास मदत होईल. 
- राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती 

महापालिकेच्या पुणे कनेक्‍ट पोर्टलच्या माध्यमातून सर्व घटकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. त्यात महिलांना सॅनिटरी नॅपकिनची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोचविता यावी, यासाठी नवी सुविधा निर्माण केली जाणार आहे. महिलांना 'एसएमएस' केल्यानंतर ते गोळा करणारी यंत्रणा त्यांच्या घरी पोचले. त्यामुळे योजनेचा उद्देशही पूर्णपणे साध्य होणार आहे. 
- कुणाल कुमार, आयुक्त महापालिका

Web Title: marathi news marathi websites Pune news Pune Municipal Corporation