कोणत्याही परिस्थितीत भाजप आघाडीत जाणार नाही : शरद पवार

मिलिंद संगई
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सध्या काँग्रेसमध्ये आक्रमक नेते दिसत नाहीत. भाजपाच्या विरोधात मोट बांधायची असेल तर चांगला पर्याय निर्माण करावा लागेल. मात्र तितक्या आक्रमकतेने बोलणारे कोणी दिसत नाही. देशामध्ये अस्वस्थता आहे; मात्र योग्य पर्याय नाही हीच कमतरता आहे

बारामती : ''कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपप्रणीत एनडीए आघाडीत सहभागी होणार नाही. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी हा खुलासा करु इच्छितो'', असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या मोदी मंत्रिमंडळात सहभागी होण्याच्या अटकळींवर आज पडदा पाडला.

बारामतीत आज ते पत्रकारांशी बोलत होते. 'या चर्चांना कसलाच अर्थ नाही' असे सांगत 'आम्ही भाजपसोबत जाणार नाही' असे ते म्हणाले. 'देशात भाजप विरोधात विरोधकांचे नेतृत्व आपण करावे, अशी सर्वांची इच्छा असल्या'चे विचारता 'आता आपले वय 78 वर्षांचे आहे. आता कशाचेही नेतृत्व करण्याची आपली मानसिकता नाही', असे सांगत त्यांनी या शक्यतांवरही आज पडदा टाकला. 

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांना माध्यमांनी 'अंडरएस्टीमेट' केले असे सांगत व्यापक जनमत पाठीशी असलेला हा नेता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही पवार म्हणाले. 'काँग्रेस पक्षाची सध्याची भूमिका मवाळ झालेली आहे का', असे विचारले असता 'प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. सध्या काँग्रेसमध्ये आक्रमक नेते दिसत नाहीत. भाजपाच्या विरोधात मोट बांधायची असेल तर चांगला पर्याय निर्माण करावा लागेल. मात्र तितक्या आक्रमकतेने बोलणारे कोणी दिसत नाही. देशामध्ये अस्वस्थता आहे; मात्र योग्य पर्याय नाही हीच कमतरता आहे', असे ते म्हणाले.

राज्यातील शेतक-यांचे 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करु असा शब्द सरकारने दिला होता, प्रत्यक्षात आजही एका शेतक-याचे कर्ज माफ झालेले नाही असे चित्र आहे, त्यामुळे सरकारच्या मनात नेमके काय आहे हेच समजेनासे झाल्याचे ते म्हणाले. 

सरकारचे अभिनंदन केले
डोकलाम प्रश्नी दोन्ही बाजूंनी सैन्य माघारी घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला फोनवरुन दिली. त्यानंतर शांतता प्रस्थापित होत असल्याने आपण सरकारचे याबाबत अभिनंदन केल्याचेही शरद पवार यांनी नमूद केले. सामंजस्याची भूमिका घेतली ही बाब चांगली असली तरी चीनने नेमके सैन्य मागे घेतले की नाही हे स्पष्ट नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

यातना कमी व्हाव्यात
जीएसटीच्या रचनेमध्ये नाही तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये दोष असल्याचे पवार यांनी सांगितले. कोणत्याही यंत्रणेचा वापर करताना ज्यांच्याकडून करांची वसूली होणार आहे त्यांच्या यातना कमी व्हाव्यात ही अपेक्षा असते ते होताना दिसत नाही असे ते म्हणाले.

Web Title: marathi news marathi websites Sharad Pawar Narendra Modi BJP NCP