महिलांच्या हाती एसटीची ‘तब्येत’

आशा साळवी 
गुरुवार, 8 मार्च 2018

पिंपरी - चाकांचे नट आवळले..., चला ब्रेक सेटिंग झाले..., ड्रायव्हर भाऊ जाऊ दे गाडी... असे संवाद एसटीच्या गॅरेजमध्ये नेहमीचेच. पण, ते महिलांच्या तोंडून ऐकले तर नक्कीच अचंबित करणारे. मात्र, वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) आगारातील कर्मचाऱ्यांना ते सवयीचे झाले आहेत. 

पिंपरी - चाकांचे नट आवळले..., चला ब्रेक सेटिंग झाले..., ड्रायव्हर भाऊ जाऊ दे गाडी... असे संवाद एसटीच्या गॅरेजमध्ये नेहमीचेच. पण, ते महिलांच्या तोंडून ऐकले तर नक्कीच अचंबित करणारे. मात्र, वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) आगारातील कर्मचाऱ्यांना ते सवयीचे झाले आहेत. 

हातात स्क्रू-ड्रायव्हर, पायात बूट, निळा शर्ट-पॅंटमधील एसटीची काळजी घेणाऱ्या महिला मेकॅनिक शिवकन्या थोरात, रूपाली जठार आणि प्रियांका पल्हाडे या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आगारात एसटी दुरुस्त करण्याचे काम लीलया पेलत आहेत. आगारात २६ महिला कर्मचारी असून वाहन चालविणे, दुरुस्त करणे, वाहतूक नियंत्रण अशी जबाबदारी त्या खुबीने सांभाळत आहेत. 

शिवकन्या थोरात (सहायक कारागीर कार्यशाळा अधीक्षक) : आयटीआयचा डिझेल मेकॅनिक अभ्यासक्रम पूर्ण. टायर फिटिंग, स्प्रिंग फिटिंग, हवा भरणे, रेडिएटर फिटिंग, वॉटर पंप बसविणे आदी अवघड कामे सहजपणे करतात. प्रशिक्षणार्थी पुरुषांनाही मार्गदर्शन करतात. 

रूपाली जठार (सहायक कारागीर) : एसटी सेवेत २००९ पासून कार्यरत. त्या म्हणतात, ‘‘एसटीने महिलांना मेकॅनिकचे काम देऊन जबाबदारीची संधी दिली आहे. त्यामुळे कामाचा अभिमान वाटतो. कोणतीही अडचण येत नाही. महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळत असल्याने त्या स्वावलंबी होत आहेत.’’

प्रियांका पल्हाडे (सहायक कारागीर) : एसटी महामंडळ महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे. कारागीर या नात्याने वाहनदुरुस्तीचे काम जबाबदारीचे आहे. परंतु, सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची संधी देऊन महिलांना समानतेचा अधिकार दिला आहे.  

पौर्णिमा होणकळसे (वाहक) : सर्वसामान्य महिलांनी संसाराचा गाडा ओढण्यासाठी चारचाकी वाहनाचे चाक हाती घेतले आहे. ते चालविण्याच्या परवान्याद्वारे त्या प्रवासी वाहन चालविण्याचे आव्हानात्मक कामही करीत आहेत.

Web Title: marathi news MSRTC International Womens Day Female mechanic pimpri