शिवशाही बसला प्रवाशांची पसंती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेली शिवशाही ही बससेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. ही बससेवा आता प्रासंगिक करारानुसारही उपलब्ध होणार आहे. आगाखान ट्रस्टने या सेवेतील 60 बस एकाचवेळी आरक्षित केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच या सेवेतील बस आरक्षित झाल्या आहेत. 

पुणे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेली शिवशाही ही बससेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. ही बससेवा आता प्रासंगिक करारानुसारही उपलब्ध होणार आहे. आगाखान ट्रस्टने या सेवेतील 60 बस एकाचवेळी आरक्षित केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच या सेवेतील बस आरक्षित झाल्या आहेत. 

उत्पन्न वाढीच्या दृष्टीने एसटीने यापूर्वी शिवनेरी, हिरकणी आदी बससेवा सुरू केल्या. शिवशाही ही सेवादेखील नुकतीच सुरू केली आहे. शिवनेरीपाठोपाठ ही सेवाही प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे, अशी माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे विभागात सुमारे 63 शिवशाही बस उपलब्ध आहेत. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत या बससेवेच्या उत्पन्नात पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर नाशिक विभाग आहे. प्रवाशांना ही सेवा उत्तम दर्जाची वाटत असल्याने प्रासंगिक करारासाठी चौकशी केली जात होती. आगाखान ट्रस्टच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त त्यांनी 1 मार्च रोजी साठ बस आरक्षित केल्या आहेत. पुण्यातील नियमित सेवा विस्कळित न करता ट्रस्टला ही बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याकरिता चाळीस नवीन बस मागविण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी 40 बस उपलब्ध करून दिल्या आहेत. 

प्रासंगिक करारासाठी या बससेवेचा दर 54 रुपये प्रतिकिलोमीटर (परतीच्या प्रवासासह) असा आहे. लग्न सोहळा, धार्मिक कार्य, सहली आदींकरिता प्रासंगिक कराराच्या बससाठी अधिकाधिक प्रवाशांनी एसटीलाच पसंती द्यावी आणि आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुखांकडे संपर्क साधावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे. पुण्यातून नाशिक, पणजी, शिर्डी, त्र्यंबकेश्‍वर, तुळजापूर, कोल्हापूर, उमरगा, दापोली, चिपळूण, हैदराबाद या ठिकाणी शिवशाही बससेवा सुरू आहे. 

Web Title: marathi news MSRTC shivshahi bus