...म्हणून राष्ट्रपतिपद नको : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

राज्यपाल आणि राष्ट्रपतिपद मिळालेली व्यक्ती निवृत्त होते. मला अजूनही सामान्य जनतेत राहायचे आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या वाटेला जायचे नाही.

(शरद पवार, अध्यक्ष​, राष्ट्रवादी काँग्रेस )

पुणे : "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत", अशा शब्दांत माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवार यांनी शुभेच्छा दिल्या. 

पण, "राज्यपाल आणि राष्ट्रपतिपद मिळालेली व्यक्ती निवृत्त होते. मला अजूनही सामान्य जनतेत राहायचे आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या वाटेला जायचे नाही", अशा सूचक शब्दांत राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पवार यांच्यासह शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी उपस्थित होती. 

प्रतिभा पाटील यांचा सत्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार होता. पण ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असे निवेदकानी सांगितले होते. या मुद्याचा धागा पकडत सुशीलकुमार शिंदेनी भाषणाची सुरवात केली . 

प्रतिभा पाटील यांना शुभेच्छा देताना, एका माजी राष्ट्रपतींचा सत्कार भावी राष्ट्रपती म्हणजे, शरद पवार यांच्या हस्ते होत असल्याचे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या खास शैलीतील टोलेबाजीला सुरवात केली. पवार यांचा भावी राष्ट्रपती असा उल्लेख होताच, उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तेवढ्यात पवार यांनी जागेवरून हात हलवून शिंदे यांच्या मताला नकार दिला.

"पवार जेव्हा नकार देतात. तो होकार असतो, हे मी ओळखतो. कारण मी त्यांचा कार्यकर्ता राहिलो आहे,'' असे सांगून शिंदे यांनी पवार यांना चिमटे काढले. तेव्हाही सभागृहाने शिंदेना दाद दिली. 

परिणामी, कार्यक्रमात राजकीय जुंगलबंदी रंगण्याची चाहूल लागली. त्यामुळे शिंदे यांच्या शुभेच्छांबाबत पवार नेमके कोणत्या शब्दांत काय उत्तर देणार, याबाबत उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

अपेक्षेप्रमाणे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पवार यांच्या भाषणाला सुरवात झाली. त्यांनी सर्वप्रथम प्रतिभा पाटील यांना शुभेच्छा दिल्या. अन्य विषयांवर बोलून झाल्यावर भाषणाच्या शेवटी पवार यांनी शिंदे यांच्या शुभेच्छांचा आर्वजून उल्लेख केला.

पवार म्हणाले, "राज्यपाल आणि राष्ट्रपतिपद मिळविलेली व्यक्ती निवृत्त होत असते. ते मला व्हायचे नाही. या पुढील काळातही जनतेत राहायचे आहे. त्यामुळे मला त्या वाटेला (राष्ट्रपतिपदी) जायचे नाही.'' 

"राज्यपाल आणि राष्ट्रपती झालेली व्यक्ती निवृत्त होते. मात्र, सुशीलकुमार राज्यपाल झाल्यानंतर ते पुन्हा दिल्लीत आले. हे त्यांनाच जमू शकते, ' असा टोलाही पवारांनी लगावला . 

"प्रतिभा पाटील यांना राजकारणात सगळी पदे मिळाली. त्यात, प्रदेशाध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपतिपदही. त्या केवळ मुख्यमंत्री होऊ शकल्या नाहीत. मुख्यमंत्रिपदही त्यांना मिळाले असते. पण, तेव्हा त्यांचे मुख्यमंत्रिपद मी हिरावून घेतले," असे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले .

ते म्हणाले, ''प्रतिभा पाटील मृदु स्वभावाच्या असल्याचा उल्लेख होतो आहे; पण, मी मुख्यमंत्री असताना त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. तेव्हा त्यांचा हा स्वभाव कधीच दिसला नाही.'' 
सत्काराला उत्तर देताना, प्रतिभा पाटील यांनीही आपले मुख्यमंत्रिपद पवारांनी हिरावून घेतल्याचे हसत हसत मान्य केले. 

Web Title: marathi news national politics president will be retired says sharad pawar