शाळा सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे - राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करत असल्याच्या निषेधार्थ, तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या किमान पटसंख्येअभावी बंद करण्यात येत असलेल्या ७६ शाळा चालू ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. ५) विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून, त्याऐवजी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांना प्रोत्साहन देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. सरकारची ही भूमिका चुकीची आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करत आहे. त्यासाठीच हे धरणे आंदोलन करत असून, राष्ट्रवादीची शाळांबाबतची भूमिका सरकारपर्यंत पोचवावी आणि केवळ पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नयेत,’ अशी मागणी कामठे, देवकाते आणि वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने टेमकर यांच्याकडे केली. 

कामठे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने २००९ पासून देशभरात ‘बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा’ लागू केला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार एकही बालक शालाबाह्य राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ व दुर्गम आहे. त्यामुळे पटसंख्येसारख्या जुजबी कारणाने शाळा बंद केल्यास अनेक बालकांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.’’

Web Title: marathi news NCP school pune