अवजड वाहनांना दिवसा 'नो एन्ट्री'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

कोरेगाव भीमा : ''पुणे-नगर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजनांसह अवजड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. यात सहा चाकांपुढील वाहनांना सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत महामार्गावर प्रवेश बंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे,'' अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली. 

कोरेगाव भीमा : ''पुणे-नगर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजनांसह अवजड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. यात सहा चाकांपुढील वाहनांना सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत महामार्गावर प्रवेश बंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे,'' अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली. 

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप, करंदी येथील विविध कारखान्यांना असलेल्या अडचणी, तसेच विविध प्रश्नांवर आयोजित बैठकीत डॉ. पखाले बोलत होते. या प्रसंगी शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे, लोणीकंदचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, फौजदार गणेश वारूळे, शिवशांत खोसे, डेक्कन चेंबर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश धोका, उपाध्यक्ष मुकुंद जहागीरदार यांच्यासह परिसरातील कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

डॉ. पखाले म्हणाले, ""पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर तोडगा काढण्यासाठी अवजड वाहनांना दिवसा प्रवेश बंदीची योजना सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोंडीतून बऱ्यापैकी सुटका होईल. तसेच, पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा येथे रस्त्यालगतचा आठवडे बाजारही हलविण्यात येणार आहे.'' 

""सर्व कारखान्यांनी कामगारांचे तसेच सुरक्षारक्षकांचे चारित्र्य पडताळणी करून त्यांची सर्व माहिती संकलित करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे गुन्हेगारीस आळा बसण्यास मदत होणार आहे. या भागात रात्री गस्त आणि दिवसा होणाऱ्या चोरीसारख्या घटनांना आळा बसविण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे,'' असे त्यांनी सांगितले. 

या वेळी काही उद्योजकांनी स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कारखान्यात विविध प्रकाराची कामे मिळविण्यासाठी दबाव आणत असल्याचे सांगितले. त्यावर कोणत्याही उद्योजकाने तक्रार केल्यास कोणाचीही गय न करता कठोर कारवाई करणार असल्याचे शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले. 

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांकडे पुणे-नगर रस्त्यावर सिग्नल बसवून देण्याची मागणी केली होती. तेव्हा लाखो रुपये खर्चून पुणे-नगर रस्त्यावर सिग्नल बसविले होते. परंतु ते सिग्नल अद्याप बंद असून त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होत असल्याचे धोका यांनी सांगितले. यावर शक्‍य त्या उपाययोजना करणार असल्याचे डॉ. पखाले व गलांडे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news no entry heavy vehicle pune news