छोट्या उद्योजकांसाठी नवी मुंबईत केंद्र - सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

निवृत्त होऊ देणार नाही
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते जूनमध्ये निवृत्त होणार आहेत, याचा कार्यक्रमात उल्लेख झाला. त्यानंतर उद्योगमंत्री देसाई यांनी आम्ही तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही, असे सांगत नवी मुंबईतल्या उद्योग केंद्र उभे करण्याचे काम तुम्ही करू शकता, असे सांगितले.

पिंपरी - ‘‘छोटे उद्योजक आणि स्टार्ट कंपन्यांना उभे करण्यासाठी नवी मुंबईमध्ये अनोखे उद्योग केंद्र उभे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 

इंजिनिअरिंग क्‍लस्टरतर्फे केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या नॅशनल व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते, पुण्याच्या उद्योग विभागाचे सहसंचालक विश्‍वनाथ राजाळे, शिवसेनेच्या शहर संघटक सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थित होते. 

नवीन उद्योजकांना व्यवसाय करताना भांडवल, तंत्रज्ञान, मार्केटिंग याचे नेमके मार्गदर्शन व्हावे, यासाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे. भांडवलाची उभारणी कशी करायची, याचे मार्गदर्शन करण्यासाठी तेथे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार असून, तिथे बॅंकांचे अधिकारी आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तंत्रज्ञान आणि मार्केटिंगसाठी हीच पद्धत अवलंबली जाणार आहे. या केंद्रामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून उद्योजकांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उद्योजकांना त्याठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांना चार महिने ते एक वर्षापर्यंत तिथे राहून आपले उत्पादन विकसित करता येणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत घेण्यात येणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. 

सध्या देशात शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यामध्ये सामंजस्य नसल्याचे चित्र आहे. जोपर्यंत या दोघांचा संगम होत नाही, तोपर्यंत उद्योग क्षेत्रात खऱ्या अर्थाने झेप घेतली जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना पदवी मिळाली तरी नोकरी मिळेल का, याची शाश्‍वती नाही. ती पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्था आणि उद्योगांनी एकत्र येण्याची गरज आहे. जर्मनीतल्या फ्रॅकपर्टमध्ये शिक्षणसंस्था आणि उद्योग यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे देसाई यांनी सांगितले. 

आपल्याकडे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने कशी लावायची, यावर अधिक संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. विजेची अडचण सोडवण्यासाठी सोलरची यंत्रणा तयार करण्याच्या संशोधनात वाढ होण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: marathi news pimpri news pune news small business new mumbai center subhash desai