...आवरा या रोडरोमिओंना

संदीप घिसे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पिंपरी - फेब्रुवारी जवळ आला की महाविद्यालयात फ्रेंडशिप डे, चॉकलेट डे, रोझ डे, व्हॅलेंटाइन डे, साडी डे असे विविध डे साजरे करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून पडली आहे. या विविध डेच्या निमित्ताने बाहेरील विद्यार्थीही चोरी-छुपे महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करतात. अशा विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. याशिवाय रोडरोमिओंकडून दररोज होणारा त्रास वेगळाच असतो. 

पिंपरी - फेब्रुवारी जवळ आला की महाविद्यालयात फ्रेंडशिप डे, चॉकलेट डे, रोझ डे, व्हॅलेंटाइन डे, साडी डे असे विविध डे साजरे करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून पडली आहे. या विविध डेच्या निमित्ताने बाहेरील विद्यार्थीही चोरी-छुपे महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करतात. अशा विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. याशिवाय रोडरोमिओंकडून दररोज होणारा त्रास वेगळाच असतो. 

मुलगी दिसली की तिच्याकडे एकटक पाहत राहणे, शिट्टी वाजविणे, विनाकारण आवाज देणे, तिच्या अगदी जवळून दुचाकी नेणे, तिचे लक्ष वेधण्यासाठी जोरात हॉर्न वाजविणे, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकी उभी करून तासन्‌तास गप्पा मारत बसणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर जोक मारणे, जाब विचारण्यास गेल्यावर भांडण करणे, विद्यार्थिनींच्या मागे-मागे जाणे, बसमध्ये बाजूच्या सीटवर किंवा मागच्या सीटवर बसणे असे प्रकार शहरातील बहुतांश सर्वच शाळा आणि महाविद्यालयाबाहेर घडताना दिसतात.

घरापासूनच होतो पाठलाग
मुलींच्या मागे शाळेपर्यंत येणारे रोडरोमिओ हे परिसरातीलच असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विद्यार्थिनी घरातून निघाल्यापासून पाठलाग होतो. यामुळे काही पालकांनी स्कूलबसचा पर्याय निवडला. मात्र, शाळेच्या आवारातही रोडरोमिओ येतात. शिक्षकांनी हटकल्यास भावाला किंवा बहिणीला न्यायला आल्याचे सांगतात. रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आपली घरेही बदलली आहेत. कामाला जाणाऱ्या आई-वडिलांच्या पाल्यांची परिस्थिती तर आणखी बिकट असते.

वेळीच आळा घाला 
छेडछाडीला कंटाळून अश्‍विनी वरखडे या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या 
हद्दीत घडली. तसेच एकतर्फी प्रेमातून एका आमदाराच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना वाकड परिसरात घडली. अशा घटना टाळायच्या असतील तर रोडरोमिओंना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.

पोलिस काकांचे दर्शन नाहीच
पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्या संकल्पनेतून पोलिसकाका हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केवळ वरिष्ठांनी आदेश दिला म्हणून नावापुरती शहरात पोलिसकाका ही संकल्पना राबविण्यात येत आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. चिंचवड येथील ताराबाई शंकरलाल मुथा कन्या शाळेत एकदाही पोलिसकाका आले नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. यामुळे अनोळखी पोलिसकाकाला विश्‍वासाने विद्यार्थिनी कसा फोन करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बदनामी नको म्हणून...
अनेक शाळा आणि महाविद्यालयाच्या बाहेर रोडरोडरोमिओंचा तळ असतो. आपण तक्रार केल्यास आणि पोलिसांनी कारवाई केल्यास आपल्या संस्थेची बदनामी होईल, या भीतीने अनेक मुख्याध्यापक आणि प्राचार्य शांत राहतात. माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले तरी आमच्याकडे असे काहीच होत नसल्याचे छातीठोकपणे सांगतात.

शिक्षकांनाही दमदाटी
शाळा-महाविद्यालयाबाहेर रोडरोमिओंकडून त्रास दिला जातो. याबाबत एखाद्या शिक्षकाने जाब विचारलाच तर त्यांनाही दमदाटी करीत बघून घेण्याची भाषा केली जाते. अशा वेळी संस्थेकडूनही त्या शिक्षकाला पाठबळ देण्याऐवजी दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जातो.

संवादाची गरज
अनेक मुली शाळा-महाविद्यालयात होणाऱ्या त्रासाबाबत पालकांना सांगत नाहीत. ते तुलाच का त्रास देतात, इतर मुलींना का त्रास देत नाहीत, अशी प्रश्‍नांची सरबती मुलींवर करून तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. कदाचित आपले शिक्षणही बंद करण्याची भीती विद्यार्थिनींना वाटते. कधी-कधी तर टोकाचे पाऊलही या विद्यार्थिनी उचलतात. असे प्रकार टाळायचे असतील तर पालकांनी आपल्या मुलींशी संवाद साधण्याची गरज आहे. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची जाणीव तिला करून द्या.

मारा; पण गुन्हा नको
पोलिस काही वेळा रोडरोमिओंवर कारवाई करतात. अशा वेळी त्या रोडरोमिओंच्या पालकांना पोलिसांकडून कळविण्यात येते. अशा वेळी ‘त्याला चांगला हाणा, पण गुन्हा दाखल करू नका’, अशी विनवणी पालकांकडून केली जाते. त्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून पोलिसही कठोर कारवाई करीत नाहीत.

ॲपवर एकही तक्रार नाही
सिटी सेफ ॲपमध्ये आतापर्यंत ८० हजार महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केले आहे. मात्र या ॲपद्वारे एकही तक्रार आलेली नाही. 

उपाययोजना
 महाविद्यालयाबाहेर थांबलेल्या रोडरोमिओंवर नियमित कारवाई व्हावी
 विद्यार्थिनींनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत तक्रार करावी
 महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर व आवारात सीसी कॅमेरे लावावेत
 महाविद्यालयाच्या वेळेत प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षकांची नियुक्‍ती करावी
 ओळखपत्राशिवाय महाविद्यालयाच्या आवारात कोणालाही प्रवेश देऊ नये
  रोडरोमिओंची माहिती लेखी स्वरूपात पोलिस ठाण्यांना कळवावी

शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांची नियमित गस्त असते. पोलिस काकाही वेळोवेळी विद्यार्थी आणि प्राचार्यांची भेट घेतात. अधिकारीही शाळेला भेट देतात. महाविद्यालयात मुख्याध्यापकांची अंतर्गत समिती असते. त्या छेडछाडीची दखल घेऊन संबंधित विद्यार्थ्यास समजही देतात. त्यानंतरही त्या विद्यार्थ्यावर काहीच परिणाम झाला नाही, तर ही समिती पोलिसांकडे तक्रार करते.
- सतीश पाटील, सहायक पोलिस आयुक्‍त-पिंपरी विभाग

शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पोलिसांची गस्त शाळेच्या परिसरात असावी. पोलिस काकांनी विद्यार्थिनींना दोन-तीन महिन्यांत एकदा भेटून विश्‍वासात घ्यावे. पोलिसांकडून मुलींचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. तसेच पालकांनी महिन्यातून एकदा मुलीच्या नकळत शाळेत येऊन चौकशी करावी.
- एस. आर. जैन, प्राचार्या-ताराबाई शंकरलाल मुथा कन्या शाळा

Web Title: marathi news pimpri news roadromio