दरवर्षी वीस टक्‍क्‍यांनी वाढताहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे - केंद्रापासून नगरपालिकेपर्यंत भाजप सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून संघांच्या शाखांची संख्या दरवर्षी वीस टक्‍क्‍यांनी वाढत आहे. संघाची व्याप्ती अजून वाढविण्यासाठी संघाकडून पूरक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

पुणे - केंद्रापासून नगरपालिकेपर्यंत भाजप सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून संघांच्या शाखांची संख्या दरवर्षी वीस टक्‍क्‍यांनी वाढत आहे. संघाची व्याप्ती अजून वाढविण्यासाठी संघाकडून पूरक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक नुकतीच नागपूर येथे झाली. या बैठकीला देशभरातील विविध क्षेत्रांतील एक हजार ४६१ हून अधिक संघ कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भातील माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत संघांचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव यांनी ही माहिती दिली. या वेळी प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात, महानगर संचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे आदी उपस्थित होते. 

या वेळी करपे म्हणाले, ‘‘पुणे महानगर क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे महानगर, पुणे जिल्हा, नगर, नाशिक आणि सोलापूर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. मागील वर्षभरात संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतात दररोज भरणाऱ्या शाखांची संख्या ७०५, आठवड्यातून एकदा भरणाऱ्या शाखांची संख्या ५९३ एवढी आहे. याशिवाय मासिक शाखांची संख्या १२० असून, शिशू गटातील शाखांची संख्या २९६, तर व्यावसायिक शाखांची संख्या १९४ एवढी आहे. दरवर्षी संघाच्या शाखांमध्ये जवळपास वीस टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. राष्ट्रविचारांचा प्रचाराची व्याप्ती वाढविणे, समाजातील तेढ कमी करणे आदी कामे विविध पातळ्यांवर संघाकडून सुरू आहेत.’’

यापूर्वी दसऱ्याला संघाचे संचालन चार ते पाच ठिकाणी होत होते. आता ४५ हून अधिक ठिकाणी संचालन होते,असे सांगून डॉ. दबडघाव म्हणाले, ‘‘समाजातील तेढ कमी करण्यासाठी सद्‌भावना बैठकांचे नियोजन केले जात आहे.’’ कोरेगाव भीमाच्या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी हे एकेकाळी संघाचे सदस्य होते. मात्र आता त्यांच्या दैनंदिन कोणत्याही गोष्टींशी संबंध नाही. संघाला कोणीही वर्ज्य नाही. संघाचे स्वयंसेवक असलेल्यांनी कोणत्या राजकीय पक्षात जावे, यावर संघाचे कोणतेही बंधन नाही.’’

Web Title: marathi news pimpri news rss branches increase