स्थायी सदस्यांचे भवितव्य बुधवारी ठरणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य येत्या २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार असून, त्याजागी नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी येत्या बुधवारी (ता. ७ फेब्रुवारी) सोडत आयोजित केली असून, नव्या आठ सदस्यांची नावे २० फेब्रुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निश्‍चित केली जाणार आहेत, तर नव्या सदस्यांसह १६ सदस्यांमधून विभागीय आयुक्तांच्या संमतीने ७ मार्च रोजी नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

स्थायीच्या नव्या सदस्यांची आणि अध्यक्षांची निवड करण्यासाठी महापालिकेने कार्यक्रम निश्‍चित केला आहे. त्यानुसार येत्या बुधवारी स्थायी समितीतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे चिठ्ठ्या टाकून केली जाणार आहे. जी नावे निवडली जातील ते सदस्य २८ फेब्रुवारीपर्यंत स्थायीच्या कामकाजात भाग घेऊ शकतील, मात्र जे सदस्य स्वत: राजीनामा देतील त्यांची मुदत तत्काळ संपुष्टात येईल. 

इच्छुक असणाऱ्या नव्या आठ सदस्यांची निवड २० फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाईल. त्यासाठी आतापासूनच सदस्यांनी आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. स्थायीमध्ये अध्यक्षांसह एकूण १६ सदस्य असून, त्यापैकी आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. सोडत असल्याने कोणत्या पक्षाचे किती सदस्य बाहेर पडणार यावर नव्या सदस्यांची निवड अवलंबून असणार आहे. एखाद्या पक्षाचे जेवढे सदस्य समितीतून बाहेर जातील तेवढेच त्या पक्षाचे नवे सदस्य निवडले जातील. त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांत कोणाचा नंबर लागतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपचे बहुमत असल्याने त्याच पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल यात शंका नाही. परंतु सदस्य बाहेर पडणे आणि नव्या सदस्यांची निवड पूर्णतः सोडतीवर अवलंबून असल्याने कोणत्याही पक्षाचे चित्र अद्याप स्पष्ट नाही.
सोडतीनंतरच त्या त्या पक्षाची भूमिका व संभाव्य नावे स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भाजपकडून अध्यक्षपदासाठी शीतल शिंदे, राहुल जाधव, अनुराधा गोफणे, हर्षल ढोरे, संदीप वाघेरे, संदीप कस्पटे, रवी लांडगे, माया बारणे, झामाबाई बारणे, उषा मुंडे आदी नगरसेवक इच्छुक
आहेत. त्यापैकी हर्षल ढोरे व उषा मुंडे या स्थायी समितीच्या विद्यमान सदस्य आहेत. सदस्य म्हणून कोण निवडले जाते आणि कोण अध्यक्ष होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news pimpri news standing committee selection