वैयक्तिक अपघात विमा योजना शिक्षण विभागालाही लागू

मिलिंद संगई
रविवार, 4 मार्च 2018

राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थातील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी (कंत्राटी कर्मचारी वगळून) यांना वैयक्तिक अपघात विमा ही योजना लागू करण्यात येणार आहे. 

बारामती - राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेली राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनांवरील शालेय शिक्षण विभागालाही लागू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थातील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी (कंत्राटी कर्मचारी वगळून) यांना 1 एप्रिल 2018 पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. 

शालेय शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या प्रशासकीय प्रमुखांना याबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे. राज्य शासकीय कर्मचा-यांना लागू केलेल्या समूह वैयक्तिक अपघात विम्याचा लाभ अनेक कर्मचा-यांना झाला. या योजनेची उपयुक्तता लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागालाही ही योजना लागू करण्याची मागणी झाली होती. त्याचा विचार करुन राज्य शासनाने परिपत्रक जारी करुन हा निर्णय जाहिर केला आहे. अपघातात जखमी झाल्यास किंवा मृत्यू आल्यास या योजनेचा लाभ संबंधितांच्या कुटुंबियांना मिळतो, त्यामुळे ही योजना सर्वांच्याच दृष्टीने महत्वाची ठरत आहे. राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या निर्णयामुळे या योजनेच्या अंतर्गत येणार आहेत. 

 

Web Title: marathi news pune baramati personal accident insurance government