दौंडमध्ये 'ई-नाम'साठी होणार शेतकऱ्यांची नोंदणी 

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 24 जानेवारी 2018

''प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभांमध्ये 'ई-नाम' (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकऱ्यांची ई -नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे''.

- रामचंद्र चौधरी, सभापती, दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती

दौंड : प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभांमध्ये 'ई-नाम' (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकऱ्यांची ई -नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामचंद्र चौधरी यांनी दिली. 
                   
दौंड येथे बाजार समिती कार्यालयात रामचंद्र चौधरी यांनी आज (ता. २४) याबाबत ही माहिती दिली. समितीचे उपसभापती विशाल शेलार, सचिव तात्यासाहेब टुले यावेळी उपस्थित होते. शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणकीकृत आणि आॅनलाइन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली असून, त्यासाठी ई - नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) हे एक व्यापार पोर्टल www.enam.gov.in निर्माण केले आहे. याद्वारे देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आलेले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आवकेची नोंद संगणकावर केली जात आहे. समित्यांमधील लिलाव, शेतीमालाची शेतकर्‍यांना दिली जाणारी पट्टी यामध्ये पारदर्शकता निर्माण झाली आहे. तसेच सर्व लिलाव, शेतमालाची नोंदणी, पट्टी खात्यावर जमा करणे आदी बाबी ई-व्यवहारांद्वारे सुरू झाल्या आहेत. तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून शेतकरी बाजार समितीमध्ये येत असल्याने व त्यांना या योजनेचे फायदे माहीत होणे आवश्यक असल्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या ग्रामसभांमध्ये त्याविषयी माहिती दिली जाणार आहे. 

या विशेष ग्रामसभेत जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधक ( सहकारी संस्था ), विपणन आणि निरीक्षण संचालनालयाचे (डीएमआय) अधिकारी, बाजार विश्लेषक, सेवा पुरवठादार, नागार्जून खत कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या ठिकाणी ई-नाम डेस्क तयार करुन शेतकर्‍यांची बँक माहितीसह पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे. शेतकर्‍यांनी आवश्यक माहितीसह २६ जानेवारी रोजी या ग्रामसभांना उपस्थित रहावे आणि योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव तात्यासाहेब टुले यांनी केले आहे.

Web Title: Marathi news pune daund news E NAAM registration for Farmers